कॉलेज परिसरातील हुल्लडबाजीसह रिफ्लेक्टरविना ऊस वाहतूक करणाऱ्यांवर पुसेगाव पोलिसांची धडक कारवाई

Digital India
0

 


 



७३ प्रकरणांत ५५ हजार ४०० रुपयांचा दंड वसूल; वाहतूक नियम मोडणाऱ्यांना दणका


बुध 

कॉलेज परिसरात हुल्लडबाजी करून वाहतुकीस अडथळा निर्माण करणारे तसेच वाहनांना रिफ्लेक्टर न लावता ऊस वाहतूक करणाऱ्या वाहनचालकांविरोधात पुसेगाव पोलिसांनी कठोर कारवाई केली आहे. या विशेष मोहिमेत एकूण ७३ प्रकरणे दाखल करून ५५ हजार ४०० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. सातारा जिल्ह्यातील बेशिस्त वाहनचालकांना शिस्त लावण्यासाठी पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे आणि अपर पोलीस अधीक्षक डॉ. वैशाली कडुकर यांच्या सूचनेनुसार ही कारवाई करण्यात आली.

पुसेगाव व खटाव परिसरातील शाळा-महाविद्यालयांच्या आवारात हुल्लडबाजी करणे, रस्त्यावर वाहतुकीस अडथळा निर्माण करणे, रॅश ड्रायव्हिंग करणे तसेच रिफ्लेक्टर न लावता ऊस वाहतूक करणे अशा प्रकारांवर पोलिसांनी लक्ष केंद्रित केले. विशेषतः रात्रीच्या वेळी रिफ्लेक्टर नसलेल्या ऊस वाहतूक वाहनांमुळे अपघाताचा धोका वाढत असल्याने अशा वाहनचालकांविरोधात कारवाई करण्यात आली.

पुसेगाव पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी पोलीस उपअधीक्षक कोमल शिंगाडे यांच्या मार्गदर्शनाखाली वाहतूक पोलीस अंमलदार संतोष बागल व बापूराव नवले यांनी विशेष नाकाबंदी मोहीम राबवली. यावेळी बेशिस्त वाहनचालकांसह कॉलेज व एसटी स्टँड परिसरातील रोडरोमिओंवरही कारवाई करण्यात आली.

या मोहिमेमुळे वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांना चांगलाच दणका बसला असून, वाहनचालकांनी वाहतुकीचे नियम पाळावेत, वाहनांना आवश्यक रिफ्लेक्टर लावावेत आणि शाळा-महाविद्यालय परिसरात शिस्त राखावी, असे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे.

Post a Comment

0 Comments
Post a Comment (0)

Made with Love by

Digital India News
Connecting India To New World Of Digital Energy
To Top