वडशेत-वावे लघुपाटबंधारे योजनेस १४०.७० कोटींची द्वितीय सुधारित प्रशासकीय मान्यता

Digital India
0


खासदार सुनील तटकरे मंत्री अदिती तटकरे व आमदार अनिकेत तटकरे यांच्या पाठपुराव्याला यश!


श्रीवर्धन तालुक्यातील पाच गावांमधील ३१६ हेक्टर क्षेत्राला मिळणार सिंचनाचा लाभ; जलसंपदा विभागाचा २६ ऑक्टोबर रोजी शासन निर्णय जारी


श्रीवर्धन प्रतिनिधी / संदीप लाड

श्रीवर्धन तालुक्यातील वडशेत-वावे लघुपाटबंधारे योजनेसाठी १४० कोटी ७० लाख रुपयांची द्वितीय सुधारित प्रशासकीय मान्यता महाराष्ट्र शासनाच्या जलसंपदा विभागाने प्रदान केली आहे. या योजनेला सुधारित मान्यता मिळवून देण्याच्या प्रक्रियेला गती मिळाल्याने खासदार सुनील तटकरे यांच्या प्रयत्नांना यश आल्याचे मानले जात आहे. यासंदर्भात शासनाने २६ ऑक्टोबर २०२६ रोजी अधिकृत शासन निर्णय जारी केला आहे.

मौजे वडशेत, ता. श्रीवर्धन, जि. रायगड येथील पश्चिम वाहिनी नदी खोरे व म्हसळा उपखोऱ्यातील स्थानिक नाल्यावर मातीचे धरण बांधण्याचे या प्रकल्पाचे स्वरूप आहे. कोकण पाटबंधारे विकास महामंडळांतर्गत राबविण्यात येणाऱ्या या योजनेमुळे श्रीवर्धन तालुक्यातील पाच गावांमधील एकूण ३१६ हेक्टर क्षेत्राला सिंचनाचा लाभ मिळणार आहे.

सन २०२३-२४ च्या सामाईक दरसूचीनुसार या प्रकल्पाची एकूण सुधारित किंमत १४०.७० कोटी रुपये निश्चित करण्यात आली आहे. यामध्ये प्रत्यक्ष कामांसाठी १३०.९३ कोटी रुपये, तर आस्थापना, संयंत्रे व इतर अनुषंगिक खर्चासाठी ९.७७ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.

या प्रकल्पाच्या द्वितीय सुधारित प्रशासकीय मान्यतेचा प्रस्ताव राज्य तांत्रिक सल्लागार समिती-२ यांच्या १२ ऑगस्ट २०२५ रोजी झालेल्या १११ व्या बैठकीत तपासण्यात आला होता. त्यानंतर वित्त विभागाच्या सहमतीसह आवश्यक प्रशासकीय प्रक्रिया पूर्ण करून शासनाने या योजनेला सुधारित मान्यता दिली आहे.

श्रीवर्धन तालुक्यातील शेतीला सिंचनाची सुविधा उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने वडशेत-वावे लघुपाटबंधारे योजना महत्त्वपूर्ण ठरणार आहे. खासदार सुनील तटकरे मंत्री अदिती तटकरे व आमदार अनिकेत तटकरे यांच्या प्रयत्नांमुळे या योजनेच्या सुधारित प्रशासकीय मान्यतेचा मार्ग मोकळा झाल्याने परिसरातील शेतकऱ्यांमध्ये समाधान व्यक्त होण्याची अपेक्षा आहे. आता या प्रकल्पाचे काम निर्धारित वेळेत पूर्ण होऊन प्रत्यक्षात सिंचनाचा लाभ शेतकऱ्यांपर्यंत पोहोचणे महत्त्वाचे ठरणार आहे.

या प्रशासकीय मान्यतेचे पत्र खासदार सुनील तटकरे यांच्या हस्ते स्वीकारताना माजी आमदार तुकाराम सुर्वे तालुका अध्यक्ष मंदार तोडणकर माजी सभापती बाबुराव चोरगे,माजी पंचायत समिती सदस्य मंगेश कोमनाक, ज्येष्ठ कार्यकर्ते सुरेश मिसाळ,हरिश्चंद्र मळेकर, वडशेत चे उपसरपंच रोशन मोरे प्रफुल्ल कासरुंग,शरद साठे, आदी पदाधिकारी उपस्थित होते

Tags

Post a Comment

0 Comments
Post a Comment (0)

Made with Love by

Digital India News
Connecting India To New World Of Digital Energy
To Top