दमणमधील अवैध मद्याची वाहतूक उघड; ४.९२ लाखांचा मुद्देमाल जप्त

Digital India
0

 



त्र्यंबकेश्वर तालुक्यातील आंबोली फाट्यावर कारवाई; क्विड कारसह २१ बॉक्स विदेशी मद्य जप्त, एकाला ताब्यात


प्रतिनिधी 

 दादरा नगर हवेली आणि दमण-दीव या केंद्रशासित प्रदेशांत निर्मित विदेशी मद्याची महाराष्ट्रात अवैधरित्या वाहतूक करणाऱ्यांविरोधात राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या नाशिक विभागीय भरारी पथकाने मोठी कारवाई केली आहे. मंगळवारी (दि. १३ ऑक्टोबर) त्र्यंबकेश्वर तालुक्यातील आंबोली शिवारातील आंबोली फाटा येथे वाहन तपासणीदरम्यान २१ बॉक्स विदेशी मद्य आणि रेनॉल्ट कंपनीची क्विड कार असा एकूण ४ लाख ९२ हजार ३६० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या प्रकरणी संतोष मुरलीधर नांगरे याच्यासह मद्याचे पुरवठादार, खरेदीदार आणि वाहनमाल यांच्याविरोधात पुढील तपास सुरू आहे.

राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या विभागीय भरारी पथकाने आंबोली फाटा, जव्हार-नाशिक रोड परिसरात अवैध मद्य वाहतुकीविरोधात सापळा रचला होता. यावेळी संशयास्पद वाहनाची तपासणी केली असता, त्यामध्ये दादरा नगर हवेली आणि दमण-दीव येथे निर्मित तसेच महाराष्ट्रात विक्रीस प्रतिबंधित असलेला विदेशी मद्यसाठा आढळून आला.

कारवाईत संबंधित मद्याचे २१ बॉक्स, एमएच १५ एचएम ८३८० क्रमांकाची रेनॉल्ट क्विड कार आणि एक मोबाईल संच जप्त करण्यात आला. या प्रकरणी राज्य उत्पादन शुल्क विभागाने गुन्हा रजिस्टर क्रमांक २६६/२०२६, दि. १३ ऑक्टोबर २०२६ अन्वये कारवाई केली आहे.

या प्रकरणातील आरोपी संतोष मुरलीधर नांगरे हा नाशिक तालुक्यातील पिंपळगाव बहुला येथील नागरे मळा, शकुंतला फार्मजवळील रहिवासी आहे.तसेच या अवैध मद्याचे पुरवठादार, खरेदीदार आणि जप्त वाहनाचा मालक यांचाही शोध घेऊन पुढील कारवाई करण्यात येणार असल्याचे विभागाने स्पष्ट केले आहे.ही कारवाई राज्य उत्पादन शुल्क विभागाचे आयुक्त डॉ. राजेश देशमुख, संचालक (अंमलबजावणी व दक्षता) प्रसाद सुर्वे आणि नाशिक विभागाच्या विभागीय उपआयुक्त उषा वर्मा यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.

विभागीय भरारी पथकाचे प्रभारी निरीक्षक किरण बा. धिंदळे, दुय्यम निरीक्षक राहुल मोडक, सहाय्यक दुय्यम निरीक्षक किरण गांगुर्डे तसेच जवान विलास कुवर, राहुल पवार, रामकृष्ण झनकर, दुर्गादास बावस्कर आणि वाहनचालक गोकुळ शिंदे यांनी या कारवाईत सहभाग घेतला. या गुन्ह्याचा पुढील तपास दुय्यम निरीक्षक राहुल मोडक करीत आहेत.

अवैध मद्य वाहतुकीची माहिती देण्याचे आवाहन अवैध मद्यनिर्मिती, विक्री किंवा वाहतुकीसंदर्भात कोणतीही माहिती अथवा तक्रार असल्यास नागरिकांनी राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या १८००२३३९९९९ या टोल फ्री क्रमांकावर किंवा ०२५३-२३१९७४४ या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन विभागाच्या वतीने करण्यात आले आहे.


Post a Comment

0 Comments
Post a Comment (0)

Made with Love by

Digital India News
Connecting India To New World Of Digital Energy
To Top