वणी प्रतिनिधी:- रितेश पारख
मराठा विद्या प्रसारक समाजाचे के. आर. टी. कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, वणी येथे भारताचे माजी राष्ट्रपती आणि थोर शास्त्रज्ञ डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्या जयंतीनिमित्त वाचन प्रेरणा दिन उत्साहात साजरा करण्यात आला.कार्यक्रमाच्या प्रारंभी डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्या प्रतिमेचे पूजन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस. एस. काळे यांच्या हस्ते करण्यात आले.
विद्यार्थ्यांमध्ये वाचनाची आवड निर्माण व्हावी, वाचन संस्कृतीचा विकास व्हावा आणि ज्ञान, विचारशक्ती व सर्जनशीलतेला चालना मिळावी, या उद्देशाने वाचन प्रेरणा दिनाचे आयोजन करण्यात आले. यावेळी डॉ. अब्दुल कलाम यांच्या जीवनकार्याचा व विचारांचा परिचय करून देण्यात आला. विद्यार्थ्यांनी नियमित वाचनाची सवय जोपासावी, पुस्तके ही ज्ञानाची खरी साधने असून वाचनामुळे व्यक्तिमत्त्व विकासासोबतच वैचारिक प्रगल्भता वाढते, असे आवाहन प्राचार्य डॉ. एस. एस. काळे यांनी आपल्या मनोगतातून केले.
महाविद्यालयाच्या ग्रंथालयाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना विविध पुस्तके, चरित्रग्रंथ, संदर्भग्रंथ आणि प्रेरणादायी साहित्य उपलब्ध करून देण्याचे महत्त्वही यावेळी अधोरेखित करण्यात आले. वाचनामुळे ज्ञानाच्या कक्षा रुंदावतात, चिकित्सक विचार करण्याची क्षमता विकसित होते आणि जीवनात यशस्वी होण्यासाठी योग्य दिशा मिळते, असा संदेश या कार्यक्रमातून देण्यात आला.कार्यक्रमास महाविद्यालयाचे प्राचार्य, प्राध्यापक, ग्रंथालय कर्मचारी आणि विद्यार्थी उपस्थित होते.वाचन प्रेरणा दिननिमित्त महाविद्यालयात ग्रंथ प्रदर्शन
