मानव–वन्यजीव संघर्ष प्रतिबंधासाठी जनजागृती आवश्यक : राजाराम काशीद

Digital India
0

  

छायाचित्र -पुसेगाव: विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना श्री. राजाराम काशीद  व्यासपीठावर प्राचार्य डॉ.सुनील हेळकर, डॉ.आशाली कारंडे, श्री.गौतम सोनकांबळे, रुपाली माने इत्यादी छाया - प्रकाश राजेघाटगे

बुध  दि [प्रकाश राजेघाटगे] 

पुसेगाव येथील कला व वाणिज्य महाविद्यालयात, राष्ट्रीय सेवा योजना विभाग  आणि वनपरिक्षेत्र वडुज, वनपरिमंडळ पुसेगाव यांच्या वतीने ‘मानव, वन्यजीव व सजीवसृष्टीचे अस्तित्व : वाघ आणि बिबट्या जनजागृती, सुरक्षितता आणि संघर्ष प्रतिबंध’ या विषयावर जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. आपल्या भाषणात श्री काशीद म्हणाले की, ' सध्या बिबट्यांच्या वाढत्या वावराच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी सतर्क राहणे गरजेचे आहे. वन्यप्राण्यांचा अधिवास प्रामुख्याने जंगलात असतो; मात्र जंगलक्षेत्रात मानवी हस्तक्षेप वाढणे, नैसर्गिक अधिवास कमी होणे आणि अन्नसाखळी विस्कळीत होणे यांमुळे वन्यप्राणी मानवी वस्तीजवळ येण्याच्या घटना घडू शकतात. त्यामुळे वन्यजीवांकडे केवळ भीतीच्या दृष्टिकोनातून न पाहता त्यांच्या नैसर्गिक जीवनपद्धतीची माहिती करून घेणे आवश्यक आहे.

  मानव–वन्यजीव संघर्ष टाळण्यासाठी घराच्या परिसरात स्वच्छता राखणे, घराबाहेर उघड्यावर कचरा टाकणे टाळणे आणि परिसरात भटक्या प्राण्यांना आकर्षित करणारे अन्नपदार्थ उघड्यावर ठेवू नयेत. रात्रीच्या वेळी एकट्याने बाहेर पडणे टाळावे. विशेषतः लहान मुले आणि ज्येष्ठ नागरिक यांच्या सुरक्षिततेकडे लक्ष द्यावे. रात्री बाहेर जाताना पुरेसा प्रकाश ठेवावा आणि निर्जन ठिकाणी जाताना आवश्यक ती खबरदारी घ्यावी, असे आवाहनही त्यांनी केले. ते पुढे म्हणाले की, निसर्गातील प्रत्येक जीव हा पर्यावरणाचा महत्त्वाचा घटक आहे. वन्यप्राण्यांचे अस्तित्व टिकून राहण्यासाठी जंगलांचे संवर्धन आणि जैवविविधतेचे संरक्षण आवश्यक आहे. वन्यप्राणी विनाकारण माणसांवर हल्ला करण्यासाठी मानवी वस्तीत येत नाहीत. त्यामुळे वन्यप्राण्यांना चिथावणी देणे, त्यांचा पाठलाग करणे किंवा त्यांच्याजवळ जाण्याचा प्रयत्न करणे टाळले पाहिजे. नागरिकांनी वन विभागाच्या सूचनांचे पालन करून वन्यजीव संरक्षणासाठी सहकार्य करावे तसेच वाघ व बिबट्या  मानव आणि वन्यजीव यांच्यातील संघर्ष टाळण्यासाठी नागरिकांमध्ये जनजागृती निर्माण करणे, वन्यप्राण्यांच्या अधिवासाचे संरक्षण करणे आणि सुरक्षिततेच्या नियमांचे पालन करणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन प्रमुख मार्गदर्शक श्रीराजाराम काशीद यांनी केले.

वाढदिवसासारख्या विशेष प्रसंगी वृक्षारोपण करून निसर्गसंवर्धनाचा संदेश द्यावा, असे आवाहनही काशीद यांनी केले. केवळ झाडे लावणे पुरेसे नसून त्यांचे संगोपन करणेही तितकेच महत्त्वाचे आहे. जंगलांचे अस्तित्व टिकले, तरच पर्यावरणाचा समतोल राखला जाईल आणि मानवासह सर्व सजीवांचे अस्तित्व सुरक्षित राहील, असे त्यांनी स्पष्ट केले. तसेच युवराज मदने यांनीही आपल्या मनोगतामधून मानव वन्यजीव सह अस्तित्व तसेच  नागरिकांमध्ये जनजागृती, सुरक्षेतता याविषयी माहिती दिली. अध्यक्षीय भाषणात महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.सुनील हेळकर म्हणाले की, 'वाढती लोकसंख्या, वृक्षतोड आणि नैसर्गिक क्षेत्रांवरील मानवी अतिक्रमण यांमुळे मानव आणि वन्यजीव यांच्यातील संघर्षाचे प्रश्न अधिक गंभीर होत आहेत. निसर्गातील झाडे, वनक्षेत्रे आणि जैवविविधता यांचे संवर्धन करणे ही प्रत्येक नागरिकाची जबाबदारी आहे. मानवाने निसर्गाच्या मर्यादा ओळखून वन्यप्राण्यांच्या अधिवासात अनावश्यक हस्तक्षेप करणे टाळले पाहिजे. वन्यजीवांचे संरक्षण आणि मानवी सुरक्षितता या दोन्ही गोष्टी एकमेकांशी संबंधित आहेत. पर्यावरणाचे संतुलन राखण्यासाठी वृक्षसंवर्धन, स्वच्छता आणि पर्यावरणपूरक जीवनशैली यांचा स्वीकार करणे गरजेचे आहे. त्याचबरोबर परिसरातील नैसर्गिक साधनसंपत्तीचे जतन करून कृषी पर्यटन, वन पर्यटन आणि पावसाळी पर्यटन यांसारख्या पर्यटन प्रकारांना प्रोत्साहन दिल्यास स्थानिक रोजगारनिर्मितीला चालना मिळू शकते. मात्र, पर्यटनाचा विकास करताना पर्यावरण आणि वन्यजीवांच्या अधिवासाचे संरक्षण प्राधान्याने केले पाहिजे, असेही त्यांनी नमूद केले. कार्यक्रमासाठी डॉ.संजय क्षीरसागर,  डॉ.आशाली कारंडे, गौतम सोनकांबळे, रुपाली माने  श्री.संतोष काळे,श्री.तुषार जगताप,प्रशांत मदने, आप्पा मोहिते  आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे कार्यक्रम अधिकारी प्रा. डॉ. किरण कुंभार यांनी केले. सूत्रसंचालन प्रा. सुधीर धोंगडे यांनी केले. तर आभार प्रा. डॉ. हनुमंत निमसे यांनी मानले कार्यक्रमासाठी महाविद्यालयातील प्राध्यापक, शिक्षकेत्तर सेवक,  विद्यार्थी,  विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.


 

Post a Comment

0 Comments
Post a Comment (0)

Made with Love by

Digital India News
Connecting India To New World Of Digital Energy
To Top