शेखाडी,कुरवडे,बागमांडला जेटींवर पोलिसांची सुरक्षा व्यवस्था अधिक सक्षम

Digital India
0


आधुनिक पोटा केबिनमुळे २४ तास गस्तीसह पोलिस कर्मचाऱ्यांना मिळणार आवश्यक सुविधा


श्रीवर्धन/ प्रतिनिधी : संदीप लाड

श्रीवर्धन तालुक्यातील संवेदनशील किनारपट्टी भागाच्या सुरक्षेला आता अधिक बळकटी मिळाली आहे. शेखाडी, कुरवडे आणि बागमांडला जेटी परिसरात पोलिसांच्या नियमित गस्तीला अधिक प्रभावी स्वरूप देण्यासाठी आधुनिक पोटा केबिनची व्यवस्था करण्यात आली आहे. त्यामुळे समुद्रकिनारी होणाऱ्या हालचालींवर लक्ष ठेवण्यास पोलिसांना मोठी मदत होणार आहे.

किनारपट्टीची सुरक्षितता लक्षात घेऊन या तीन महत्त्वाच्या ठिकाणी पोलिस बंदोबस्त व गस्तीसाठी स्वतंत्र सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. पोटा केबिनमध्ये पोलिस कर्मचाऱ्यांना आवश्यक सोयी उपलब्ध असल्याने प्रतिकूल हवामानातही कर्तव्य बजावणे अधिक सुलभ होणार आहे.

विशेषतः बागमांडला जेटी परिसरात यापूर्वी समुद्राच्या भरतीदरम्यान सुरक्षेच्या दृष्टीने काही अडचणी निर्माण होत होत्या. या पार्श्वभूमीवर पोलिस प्रशासनाने तातडीने उपाययोजना करून पोटा केबिन उभारले आहे. त्यामुळे परिसरात सतत पोलिसांची उपस्थिती राहण्यास मदत होणार आहे.

किनारपट्टी सुरक्षेला प्राधान्य

श्रीवर्धन तालुक्याला मोठी समुद्रकिनारपट्टी लाभली असून विविध जेटींवर नागरिक तसेच प्रवाशांची नियमित वर्दळ असते. त्यामुळे या परिसरात कोणतीही संशयास्पद हालचाल आढळल्यास तातडीने प्रतिसाद देणे आवश्यक आहे. नव्या सुविधेमुळे पोलिसांना गस्त, निरीक्षण आणि आपत्कालीन परिस्थितीत कारवाई अधिक वेगाने करता येणार आहे.

या सुरक्षा व्यवस्थेमुळे स्थानिक नागरिकांमध्येही समाधानाचे वातावरण आहे. समुद्रकिनारी पोलिसांची नियमित उपस्थिती वाढल्याने किनारपट्टी अधिक सुरक्षित राहण्यास मदत होईल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.

रायगड जिल्हा पोलीस अधिक्षक आँचल दलाल यांच्या मार्गदर्शनाखाली आणि श्रीवर्धन पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुरेंद्र गरड यांच्या देखरेखीखाली ही सुरक्षा व्यवस्था कार्यान्वित करण्यात आली आहे.

Tags

Post a Comment

0 Comments
Post a Comment (0)

Made with Love by

Digital India News
Connecting India To New World Of Digital Energy
To Top