प्रतिनिधी - संदीप लाड
रायगडचे ज्येष्ठ आणि लोकप्रिय खासदार सुनील तटकरे यांच्याबद्दल शिवसेना नेते रामदास कदम यांनी वापरलेल्या अपशब्दांचा श्रीवर्धन शहर आणि तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने जाहीर निषेध करण्यात आला आहे. रामदास कदम यांच्या या वादग्रस्त वक्तव्यामुळे संपूर्ण मतदारसंघात कार्यकर्त्यांमध्ये आणि जनतेमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे. या निषेधार्थ सोमवार, २० जुलै २०२६ रोजी पंचायत समिती श्रीवर्धन ते छत्रपती शिवाजी महाराज चौक दरम्यान भव्य निषेध मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते श्रीवर्धन येथील या मोर्चात राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने एकत्र आले होते.
कार्यकर्त्यांनी रामदास कदम यांच्या विरोधात तीव्र घोषणाबाजी करत परिसर दणाणून सोडला. सुनील तटकरे साहेबांचा अपमान करणाऱ्या रामदास कदम यांचा धिक्कार असो, अशा घोषणा यावेळी देण्यात आल्या.यावेळी स्थानिक नेत्यांनी आपल्या संतप्त भावना व्यक्त करताना सांगितले की, खासदार सुनील तटकरे यांनी रायगड जिल्ह्यामध्ये कोट्यवधी रुपयांचा निधी आणून विकासकामांचा डोंगर उभा केला आहे. वैचारिक लढाई लढण्याऐवजी रामदास कदम नेहमीच वैयक्तिक आणि खालच्या पातळीवर जाऊन टीका करतात, जी महाराष्ट्राच्या सुसंस्कृत राजकारणाला शोभणारी नाही.रामदास कदम यांचे राजकीय संतुलन बिघडले असून ते प्रसिद्धीसाठी अशी बेताल वक्तव्ये करत आहेत.रामदास कदम यांनी खासदार सुनील तटकरे यांची आणि रायगडच्या जनतेची जाहीर माफी मागावी, अशी मागणी यावेळी करण्यात आली. जर त्यांनी माफी मागितली नाही, तर यापुढे त्यांना रायगड जिल्ह्यात पाऊल ठेवू दिले जाणार नाही आणि तीव्र आंदोलन छेडले जाईल,असा इशारा श्रीवर्धन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने देण्यात आला आहे
.या निषेध मोर्चाला माजी आमदार तुकाराम सुर्वे,जिल्हा उपाध्यक्ष महमद मेमन,मतदार संघ अध्यक्ष उदय बापट,तालुका अध्यक्ष मंदार तोडणकर, सभापती सुचिन कीर, महिला अध्यक्ष सबा फिरफिरे, उपाध्यक्ष अमित खोत,उपनगराध्यक्ष अनंत गुरव, गटनेते समीर साठविलकर माजी नगराध्यक्ष बाळा सातनाक नगरसेविका प्रविता माने, राजसी मुरकर,महिला शहर अध्यक्ष रुची बोरकर,शिवानी चौले जेष्ठ नेते हिदायत कुदरते माजी सभापती बाबुराव चोरगे, पंचायत समिती सदस्य अस्मिता चोरगे लाला जोशी,प्रकाश रिकामे ,शब्बीर फिरफिरे, सुजित पाटील सिद्धेश कोसबे, सुरेश मांडवकर प्रगती अदावडे दिक्षा टाकले यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्व नगरसेवक, प्रमुख पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
