आराठीतील भंगार व्यवसाय संशयाच्या भोवऱ्यात; दोन नोटिसांनंतरही कागदपत्रे गायब, कारवाईची मागणी

Digital India
0


श्रीवर्धन प्रतिनिधी/संदीप लाड

श्रीवर्धन तालुक्यातील आराठी ग्रामपंचायत हद्दीत सुरू असलेल्या भंगार खरेदी-विक्री व्यवसायाबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून, संबंधित व्यावसायिकाला ग्रामपंचायतीने दोन वेळा नोटीस बजावूनही आवश्यक कागदपत्रे सादर करण्यात आलेली नसल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे या प्रकरणात कायदेशीर कारवाई करण्याची मागणी स्थानिक नागरिकांकडून होत आहे.

आराठी ग्रामपंचायतीने संबंधित व्यावसायिकाला व्यवसायाच्या वैधतेसंदर्भातील सर्व आवश्यक कागदपत्रे तातडीने ग्रामपंचायत कार्यालयात सादर करण्याचे आदेश दिले होते. नोटीसमध्ये व्यवसाय सुरू असलेल्या जागेच्या मालकाचे संमतीपत्र (NOC), ७/१२ उतारा, ग्रामपंचायतीचा नाहरकत दाखला, संबंधित शासकीय विभागांकडून मिळालेल्या परवानग्यांच्या प्रती, तसेच आधारकार्ड, रेशनकार्ड, असेसमेंट उतारा, कायमस्वरूपी रहिवासी असल्याचा पुरावा आणि व्यवसायासाठी आवश्यक असलेले अधिकृत परवाने सादर करण्यास सांगण्यात आले आहे.

ग्रामपंचायतीच्या म्हणण्यानुसार, कोणताही व्यवसाय सुरू करण्यासाठी आवश्यक परवानग्या व नोंदी असणे बंधनकारक आहे. त्यामुळे संबंधित व्यवसायाची संपूर्ण माहिती ग्रामपंचायतीकडे उपलब्ध असणे आवश्यक असल्याने ही प्रक्रिया राबविण्यात येत आहे.

मात्र, सलग दोन नोटिसा बजावूनही संबंधित व्यावसायिकाने कागदपत्रे का सादर केली नाहीत? हा प्रश्न आता उपस्थित होत आहे. नोटिसांकडे दुर्लक्ष करण्यामागचे कारण काय, तसेच संबंधित व्यवसाय सर्व आवश्यक परवानग्यांसह सुरू आहे का, याची सखोल चौकशी करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.

याप्रकरणी नियमांचे उल्लंघन झाल्याचे आढळल्यास संबंधितांवर कायदेशीर कारवाई करावी, तसेच ग्रामपंचायत हद्दीतील इतर विनापरवाना सुरू असलेल्या व्यवसायांचीही तपासणी करून आवश्यक ती कारवाई करावी, अशी मागणी आता जोर धरत आहे.

या प्रकरणामुळे श्रीवर्धन तालुक्यातील भंगार व्यवसायांच्या वैधतेचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आला असून, प्रशासन पुढे कोणती भूमिका घेते याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.

Post a Comment

0 Comments
Post a Comment (0)

Made with Love by

Digital India News
Connecting India To New World Of Digital Energy
To Top