श्रीवर्धन मतदारसंघातील जिल्हा परिषद शाळेची दयनीय अवस्था; छत गळू लागल्याने ग्रामस्थांनीच टाकले प्लास्टिक

Digital India
0


विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर; शिक्षण विभाग आणि प्रशासनाच्या दुर्लक्षावर संताप


श्रीवर्धन प्रतिनिधी /संदीप लाड

रायगड जिल्ह्यातील श्रीवर्धन तालुक्यातील बापवली येथील जिल्हा परिषद शाळेची अत्यंत दयनीय अवस्था समोर आली आहे. सततच्या पावसामुळे शाळेच्या इमारतीच्या छताला मोठ्या प्रमाणात गळती लागल्याने वर्गखोल्यांमध्ये पाणी साचत आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना सुरक्षित वातावरणात शिक्षण घेणे कठीण झाले असून शिक्षकांनाही अध्यापन करताना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे.

शाळेची ही गंभीर परिस्थिती लक्षात आल्यानंतर प्रशासनाकडून तातडीची कोणतीही उपाययोजना न झाल्याने गावकऱ्यांनी स्वतः पुढाकार घेत शाळेच्या छतावर प्लास्टिक टाकून गळती रोखण्याचा प्रयत्न केला. ग्रामस्थांच्या या कृतीमुळे विद्यार्थ्यांचे शिक्षण काही प्रमाणात सुरू ठेवणे शक्य झाले असले, तरी ही परिस्थिती शिक्षण व्यवस्थेतील दुर्लक्ष अधोरेखित करणारी असल्याची भावना व्यक्त होत आहे.

विशेष म्हणजे, विकासकामांच्या दाव्यांवर भर दिल्या जाणाऱ्या श्रीवर्धन विधानसभा मतदारसंघात जिल्हा परिषद शाळेवर प्लास्टिक टाकण्याची वेळ येणे ही अत्यंत खेदजनक बाब असल्याची प्रतिक्रिया स्थानिक नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे. विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचा आणि सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला असतानाही शाळेच्या दुरुस्तीकडे वेळेत लक्ष न दिल्याबद्दल शिक्षण विभाग आणि संबंधित प्रशासनावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.

ग्रामस्थांनी शाळेच्या इमारतीची तातडीने दुरुस्ती करून विद्यार्थ्यांना सुरक्षित व सुस्थितीत शिक्षणाची सुविधा उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी केली आहे. आगामी काळात पावसाचा जोर वाढल्यास परिस्थिती आणखी गंभीर होण्याची शक्यता असल्याने प्रशासनाने या प्रकरणात त्वरित हस्तक्षेप करून कायमस्वरूपी उपाययोजना करावी, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

Post a Comment

0 Comments
Post a Comment (0)

Made with Love by

Digital India News
Connecting India To New World Of Digital Energy
To Top