श्री सुरेशदादा जैन फार्मसी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांची जिल्हा शासकीय वैद्यकीय रुग्णालयास शैक्षणिक भेट

Digital India
0


जिल्हा प्रतिनिधी : महेशप्रसाद दिक्षित, जामनेर

श्री सुरेशदादा जैन फार्मसी महाविद्यालयातील चतुर्थ वर्ष बी. फार्मसीच्या विद्यार्थ्यांनी प्रॅक्टिस स्कूल (BP-706PS) अंतर्गत जळगाव येथील जिल्हा शासकीय वैद्यकीय रुग्णालयाला शैक्षणिक भेट दिली. या भेटीद्वारे विद्यार्थ्यांना औषधनिर्माण व आरोग्यसेवा क्षेत्रातील प्रत्यक्ष कार्यपद्धतीची माहिती मिळाली.

भेटीदरम्यान विद्यार्थ्यांनी रुग्णालयातील औषध वितरण व्यवस्था, औषध साठवणूक प्रक्रिया, रुग्णसेवा तसेच विविध आरोग्यसेवांचे बारकाईने निरीक्षण केले. याशिवाय, रुग्णालयात वापरण्यात येणाऱ्या ई-औषधी सॉफ्टवेअरची माहिती आणि त्याचे प्रत्यक्ष प्रात्यक्षिक पाहून औषधांच्या आवक-जावक व्यवस्थापनाबाबत सखोल ज्ञान प्राप्त केले.

यावेळी वरिष्ठ फार्मासिस्ट श्री. प्रमोदजी पाटील यांनी विद्यार्थ्यांना बी. फार्मसीनंतर सरकारी क्षेत्रामध्ये उपलब्ध असलेल्या विविध करिअरच्या संधींबाबत मार्गदर्शन केले. त्यांनी विद्यार्थ्यांच्या शंकांचे निरसन करत शासकीय सेवेमधील संधी आणि आव्हानांवर प्रकाश टाकला.

या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांना सैद्धांतिक ज्ञानाची प्रत्यक्ष कार्यपद्धतीशी सांगड घालण्याची संधी मिळाली असून त्यांचा व्यावसायिक दृष्टिकोन अधिक व्यापक झाला आहे. विद्यार्थ्यांसाठी ही भेट ज्ञान, अनुभव आणि प्रेरणा देणारी ठरली.

या शैक्षणिक भेटीचे समन्वयन प्रो. सुनील तडवी यांनी केले, तर उपसमन्वयक म्हणून प्रो. योगेश बागड आणि प्रो. चारुलता सुर्यवंशी यांनी सहकार्य केले. महाविद्यालयाच्या या उपक्रमाचे सर्व स्तरांतून कौतुक करण्यात येत आहे.

Post a Comment

0 Comments
Post a Comment (0)

Made with Love by

Digital India News
Connecting India To New World Of Digital Energy
To Top