श्रीवर्धन पोलिसांची धडक कारवाई; ३५ लाखांचा अमली पदार्थ 'चरस' जप्त, ६३ वर्षीय आरोपी जेरबंद

Digital India
0


प्रतिनिधी संदीप लाड

रायगड जिल्ह्यातील श्रीवर्धन पोलिसांनी अमली पदार्थ तस्करांविरुद्ध एक मोठी आणि अत्यंत यशस्वी कारवाई केली आहे. पोलिसांनी गुप्त माहितीच्या आधारे सापळा रचून शेखाडी येथून तब्बल ६.९९६ किलो वजनाचा उच्च दर्जाचा 'चरस' हा अमली पदार्थ जप्त केला आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात या जप्त केलेल्या चरसची एकूण किंमत ३४ लाख ९८ हजार रुपये एवढी आहे. या धडक कारवाई दरम्यान पोलिसांनी एका ६३ वर्षीय संशयित आरोपीला अटक केली असून, गुन्ह्यात वापरलेली २५ हजार रुपये किमतीची जुनी मोटार सायकल आणि २ हजार रुपये किमतीचा मोबाईल फोन असा एकूण मुद्देमाल हस्तगत केला आहे. सादिक इब्राहिम शेखदरे (वय ६३ वर्षे, रा. शेखाडी, ता. श्रीवर्धन, जि. रायगड) असे अटक करण्यात आलेल्या तस्कराचे नाव आहे.ही संपूर्ण कारवाई श्रीवर्धन पोलीस ठाण्याच्या हद्दीत अत्यंत गोपनीयतेने पार पडली. 

१८ जुलै २०२६ रोजी श्रीवर्धन पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुरेंद्र गरड यांना बातमीदाराकडून ठोस माहिती मिळाली होती की, शेखाडी गावातील सादिक शेखदरे हा इसम चरस विक्री करण्याच्या उद्देशाने फिरत आहे. या माहितीच्या आधारे पोलिसांनी त्वरित हालचाली करत शेखाडीकडून आरावीकडे जाणाऱ्या रस्त्यावरील कोंडीवली स्मशानभूमीसमोर दबा धरून सापळा रचला. संशयास्पद स्थितीत मोटार सायकलवरून येणाऱ्या सादिक शेखदरे याला पोलिसांनी थांबवून त्याच्या गाडीची झडती घेतली असता, त्याच्या मोटार सायकलच्या डिक्कीमध्ये १० लाख ७३ हजार रुपये किमतीचे २.१४६ किलो ग्रॅम वजनाचे चरसचे दोन पाकिटे आढळून आले. पोलिसांनी तात्काळ गुन्हा दाखल करून आरोपीला अटक केली.अटक केल्यानंतर आरोपीला न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने त्याला २२ जुलै २०२६ पर्यंत पोलीस कस्टडी मंजूर केली. पोलीस कोठडी दरम्यान पोलिसांनी आरोपीला विश्वासात घेऊन त्याची सखोल चौकशी केली. 

या चौकशी दरम्यान त्याने आणखी अमली पदार्थ लपवून ठेवल्याची कबुली दिली. पोलिसांनी आरोपीला सोबत घेऊन पंचसमक्ष कारवाई करत, एका बंद असलेल्या फायबर बोटीची झडती घेतली. या बोटीत लपवून ठेवलेला आणखी २४ लाख २५ हजार रुपये किमतीचा ४.८५० किलो ग्रॅम चरस पोलिसांनी हस्तगत केला. अशा प्रकारे पोलिसांनी या गुन्ह्यात एकूण ६.९९६ किलो ग्रॅम अमली पदार्थ जप्त करण्यात यश मिळवले आहे.ही कामगिरी रायगड जिल्ह्याच्या पोलीस अधीक्षक श्रीमती आँचल दलाल, अप्पर पोलीस अधीक्षक मा. अभिजीत शिवथरे आणि श्रीवर्धन डिव्हिजनच्या उपविभागीय पोलीस अधिकारी मा. सविता गर्जे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. तसेच या कारवाई पथकात श्रीवर्धन पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुरेंद्र गरड, पोसई प्रदिप राठोड यांच्यासह पोलीस कर्मचारी अ‍ॅड. हिवाळे, कुष्णहरी कदम, दादासाहेब खिल्लारी, पांडुरंग तनपुरे, विकास काळेल, नदीम शेख, कांचन जवान आणि महिला पोलीस कर्मचारी ज्ञानेश्वरी बामणेकर यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. या गंभीर गुन्ह्याचा पुढील सखोल तपास पोसई प्रदिप राठोड करत आहेत.

Post a Comment

0 Comments
Post a Comment (0)

Made with Love by

Digital India News
Connecting India To New World Of Digital Energy
To Top