श्रीवर्धन महसूल कार्यालयातील सहायक महसूल अधिकारी व शिपाई ३० हजारांची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून रंगेहात अटक

Digital India
0


प्रतिनिधी/संदीप लाड

जमीन मालकी हक्काच्या फेरफार नोंद मंजुरी आदेश करून देण्यासाठी ४० हजार रुपयांची लाच मागून तडजोडीअंती ३० हजार रुपयांची लाच स्वीकारताना श्रीवर्धन येथील उपविभागीय अधिकारी कार्यालयातील दोन शासकीय कर्मचाऱ्यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB) रंगेहात पकडले आहे. या कारवाईमुळे महसूल वर्तुळात प्रचंड खळबळ माजली आहे.

लाचखोर लोकसेवकांची नावे:

१. नितीन सदाशिव पवार (वय ४२) - सहायक महसूल अधिकारी (वर्ग-३), उपविभागीय अधिकारी कार्यालय, महसूल विभाग, श्रीवर्धन.

२. सचिन रमाकांत पाटील (वय ४८) - शिपाई (वर्ग-४), उपविभागीय अधिकारी कार्यालय, महसूल विभाग, श्रीवर्धन.

तक्रारदार यांच्या जावई याचे नावावर मौजे देवघर (तालुका म्हसळा) येथे शेतजमीन आहे. या जमिनीचा फेरफार नोंद मंजुरी आदेश देण्यासाठी सहायक महसूल अधिकारी नितीन पवार यांनी ४० हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली होती. तक्रारदाराची लाच देण्याची इच्छा नसल्याने त्यांनी याप्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल केली.

ACB च्या पथकाने १६ जून २०२६ रोजी केलेल्या पडताळणी दरम्यान, नितीन पवार यांनी ४० हजार रुपयांची लाच मागितल्याचे निष्पन्न झाले. अखेर तडजोडीअंती ३० हजार रुपये घेण्याचे ठरले.

मिळालेल्या तक्रारीवरून लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या ठाणे आणि अलिबाग पथकाने १७ जून २०२६ रोजी श्रीवर्धन येथील सार्वजनिक बांधकाम विभाग कार्यालयाच्या पश्चिम रस्त्यावर सापळा रचला. नितीन पवार यांच्या सांगण्यावरून शिपाई सचिन रमाकांत पाटील याने तक्रारदाराकडून ३० हजार रुपयांची लाचेची रक्कम स्वीकारली. रक्कम स्वीकारताच दबा धरून बसलेल्या ACB च्या पथकाने दोन्ही आरोपींना रंगेहात ताब्यात घेतले.

दोन्ही आरोपींविरुद्ध श्रीवर्धन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, ठाणे आणि रायगड-अलिबाग येथील वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आलीa

Post a Comment

0 Comments
Post a Comment (0)

Made with Love by

Digital India News
Connecting India To New World Of Digital Energy
To Top