प्रतिनिधी, संदीप लाड
बकरी ईद सणाच्या पार्श्वभूमीवर शहरात कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी आणि शांततेचे वातावरण निर्माण करण्यासाठी श्रीवर्धन पोलीस ठाण्याच्या वतीने शहरात मुख्य मार्गांवरून दिमाखात रूट मार्च (संचलन) काढण्यात आला.
सण-उत्सव शांततेत आणि सलोख्याच्या वातावरणात पार पडावेत, तसेच गुन्हेगारांवर वचक निर्माण व्हावा आणि सर्वसामान्य नागरिकांमध्ये सुरक्षेची भावना निर्माण व्हावी, हा या रूट मार्चचा मुख्य उद्देश होता.
मुख्य मार्गांवरून संचलन
हा रूट मार्च श्रीवर्धन पोलीस ठाण्यापासून सुरू झाला. त्यानंतर शहरातील प्रमुख बाजारपेठ, संवेदनशील परिसर, मशिदींचे परिसर आणि मुख्य चौकांमधून मार्गक्रमण करत पुन्हा पोलीस ठाण्यात या संचलनाची सांगता झाली. या मार्चमध्ये पोलिसांचा मोठा फौजफाटा सहभागी झाला होता. हातात लाठ्या आणि पूर्ण गणवेशात शिस्तबद्ध पद्धतीने चालणाऱ्या पोलीस जवानांमुळे शहरात चोख पोलीस बंदोबस्ताचे चित्र पाहायला मिळाले.
नागरिकांना अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन
रूट मार्चदरम्यान पोलीस प्रशासनाने नागरिकांना बकरी ईदचा सण उत्साहात आणि सामाजिक सलोखा राखून साजरा करण्याचे आवाहन केले. तसेच सोशल मीडियावर येणाऱ्या कोणत्याही आक्षेपार्ह पोस्ट किंवा अफवांवर विश्वास ठेवू नये आणि शहरात शांतता भंग होईल असे कोणतेही कृत्य करू नये, असे स्पष्ट निर्देश पोलिस निरीक्षक सुरेंद्र गरड यांनी दिले आहेत.
संशयास्पद हालचाली आढळल्यास त्वरित पोलिसांशी संपर्क साधण्याचे आवाहनही करण्यात आले आहे.
या रूट मार्चमुळे श्रीवर्धन शहरात शांतता आणि सुरक्षेचे वातावरण निर्माण झाले असून, नागरिकांनी पोलिसांच्या या मोहिमेचे स्वागत केले आहे
