” उत्साहात संपन्न सुजात आंबेडकर यांचा शिक्षणाच्या बाजारपेठीकरणावर घणाघात; सरकारच्या धोरणांवर टीका
वणी : रितेश पारख
वंचित बहुजन आघाडी, दिंडोरी तालुक्याच्या वतीने आयोजित करण्यात आलेली “बहुजन हक्क निर्धार परिषद” शुक्रवार दि. १५ मे रोजी वणी येथील खुशी बँक्वेट हॉल येथे उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाली. बहुजन समाजाचे हक्क, सामाजिक न्याय, संविधानिक मूल्यांचे संरक्षण आणि संघटनात्मक बांधणी या मुद्द्यांवर परिषदेत सखोल मार्गदर्शन करण्यात आले. परिषदेला तालुकाभरातून युवा कार्यकर्ते, महिला आघाडी, सामाजिक संघटना तसेच बहुजन विचारांचे नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.कार्यक्रमात वंचित बहुजन आघाडीचे युवा नेते सुजात आंबेडकर यांनी प्रमुख मार्गदर्शन करताना केंद्र व राज्य सरकारच्या विविध धोरणांवर जोरदार टीका केली. शिक्षण क्षेत्राचे वाढते खासगीकरण आणि शिक्षणाचा होत असलेला बाजार यावर बोलताना त्यांनी सांगितले की, “शिक्षण हे सर्वसामान्यांचे मूलभूत अधिकार असून सरकारने ते भांडवलदारांच्या दावणीला बांधले आहे. गरीब, शेतकरी, कामगार आणि बहुजन समाजातील विद्यार्थ्यांना शिक्षणापासून दूर ठेवण्याचा हा अप्रत्यक्ष प्रयत्न आहे.”
तसेच त्यांनी बहुजन समाजाने संघटित होऊन सामाजिक व राजकीय ताकद वाढवण्याची गरज व्यक्त केली. “वंचित बहुजन आघाडीची ताकद वाढवण्यासाठी प्रत्येक कार्यकर्त्याने गावपातळीवर संघटन मजबूत करण्यासाठी प्रयत्न करावेत. संविधानिक मूल्यांवर आधारित नवे लोकशाहीमूलक राजकारण उभे करण्याची वेळ आली आहे,” असेही ते म्हणाले.
राज्य प्रवक्त्या दिशा पिंकी शेख यांनी सरकारच्या धोरणांवर सडकून टीका करताना बेरोजगारी, महागाई, सामाजिक विषमता आणि संविधानिक संस्थांवरील दबाव यांसारख्या विषयांवर भाष्य केले. “सरकारची धोरणे ही सर्वसामान्य, आदिवासी, मुस्लिम, बौद्ध आणि ओबीसी समाजासाठी घातक ठरत असून बहुजन समाजाला मुख्य प्रवाहापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न सुरू आहे,” असा आरोप त्यांनी केला. महिलांनी सामाजिक आणि राजकीय चळवळीत मोठ्या प्रमाणावर सहभागी व्हावे, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.
जिल्हाध्यक्ष चेतन गांगुर्डे यांनी दिंडोरी तालुक्यातील स्थानिक प्रश्नांवर पोटतिडकीने भाष्य केले. “स्थानिक मंत्री असूनही तालुक्यातील नागरिकांना मूलभूत सुविधांसाठी संघर्ष करावा लागत आहे. रस्ते, पाणी, शिक्षण, रोजगार आणि आरोग्याच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष होत असून सामान्य नागरिक अनेक अडचणी सहन करत आहेत,” असे सांगत त्यांनी प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर नाराजी व्यक्त केली.
यावेळी माजी उपसरपंच किरण गांगुर्डे यांनी आपल्या मनोगतात स्थानिक स्वराज्य संस्थांमधील बहुजन समाजाच्या ताकदीवर भाष्य केले. “गावपातळीवर बहुजन समाजाची मोठी ताकद असून गट व गण पातळीवर ती निर्णायक ठरत असते. कार्यकर्त्यांनी एकजुटीने काम केल्यास वंचित बहुजन आघाडी निश्चितच अधिक बळकट होईल,” असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
युवा आघाडीचे जिल्हा महासचिव संविधान गांगुर्डे यांनी परिषदेमागील भूमिका स्पष्ट करताना बहुजन समाजाच्या एकजुटीतून सामाजिक न्यायाची लढाई अधिक मजबूत करण्याचा निर्धार व्यक्त केला.
परिषद यशस्वी करण्यासाठी तालुकाध्यक्ष बाळासाहेब शेजवळ, जिल्हा उपाध्यक्ष प्रशांत अहिरे, युवा महासचिव विकी दुर्धवळे, शहराध्यक्ष तुषार मोरे, उपाध्यक्ष संकेत गांगुर्डे, समाधान शिरसाठ, विशाल गांगुर्डे, दादा मोरे आदी पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले.
वणी येथे “बहुजन हक्क निर्धार परिषद” उत्साहात संपन्न
सुजात आंबेडकर यांचा शिक्षणाच्या बाजारपेठीकरणावर घणाघात; सरकारच्या धोरणांवर टीकावंचित बहुजन आघाडी, दिंडोरी तालुक्याच्या वतीने आयोजित “बहुजन हक्क निर्धार परिषद” शुक्रवार दि. १५ मे रोजी वणी येथील खुशी बँक्वेट हॉल येथे उत्साहात संपन्न झाली. परिषदेत सामाजिक न्याय, संविधानिक हक्क, शिक्षण, रोजगार, आरक्षण आणि बहुजन समाजाच्या एकजुटीवर मार्गदर्शन करण्यात आले. तालुकाभरातून कार्यकर्ते, महिला आघाडी व बहुजन विचारांचे नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी वंचित बहुजन आघाडीचे युवा नेते सुजात आंबेडकर यांनी शिक्षणाच्या वाढत्या खासगीकरणावर टीका करताना “शिक्षणाचा बाजार मांडून सर्वसामान्य विद्यार्थ्यांना शिक्षणापासून दूर ठेवले जात आहे,” असे सांगितले. तसेच बहुजन समाजाने संघटित होऊन वंचित बहुजन आघाडीची ताकद वाढवण्यासाठी गावपातळीवर काम करण्याचे आवाहन त्यांनी केले.
राज्य प्रवक्त्या दिशा पिंकी शेख यांनी सरकारच्या धोरणांवर सडकून टीका करत बेरोजगारी, महागाई आणि सामाजिक विषमतेच्या प्रश्नांकडे लक्ष वेधले. जिल्हाध्यक्ष चेतन गांगुर्डे यांनी स्थानिक मंत्री असूनही तालुक्यातील नागरिकांना मूलभूत सुविधांसाठी संघर्ष करावा लागत असल्याची खंत व्यक्त केली.
माजी उपसरपंच किरण गांगुर्डे यांनी मनोगतात बहुजन समाजाची स्थानिक पातळीवरील ताकद गट व गणात निर्णायक ठरत असल्याचे सांगत, कार्यकर्त्यांनी एकजुटीने काम केल्यास पक्ष अधिक बळकट होईल, असा विश्वास व्यक्त केला.
परिषद यशस्वी करण्यासाठी तालुकाध्यक्ष बाळासाहेब शेजवळ, प्रशांत अहिरे, विकी दुर्धवळे, तुषार मोरे, संकेत गांगुर्डे, समाधान शिरसाठ, विशाल गांगुर्डे, दादा मोरे आदी पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले.
