प्रतिनिधी /संदीप लाड
रायगड लोकसभेचे खासदार सुनील तटकरे यांनी आज श्रीवर्धन शहरासह परिसरातील विविध महत्त्वपूर्ण विकासकामांची प्रत्यक्ष जागेवर जाऊन पाहणी केली.उपजिल्हा रुग्णालय येथे डायलेसिस सेंटरचे लोकार्पण केले या दौऱ्यात त्यांनी भू नाळे तलाव, भव्य शिवसृष्टी, पेशवे स्मारक आणि जीवना बंदर यांसारख्या प्रमुख प्रकल्पांचा आढावा घेतला.
महत्त्वाच्या कामांचा आढावा:
भू नाळे तलाव सुशोभीकरण: तलावाच्या सौंदर्यीकरणाचे काम अंतिम टप्प्यात असून, पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी येथे जागतिक दर्जाच्या सुविधा निर्माण करण्यावर भर दिला जात आहे.
भव्य शिवसृष्टी व पेशवे स्मारक: श्रीवर्धनच्या ऐतिहासिक वैभवात भर टाकणाऱ्या शिवसृष्टी आणि पेशवे स्मारकाच्या कामाची तटकरे यांनी बारकाईने पाहणी केली. ही स्मारके पुढील पिढीसाठी प्रेरणादायी ठरतील, असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.
जीवना बंदर विकास: मच्छिमारांच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाच्या असलेल्या जीवना बंदराच्या कामाचा आढावा घेऊन, येथील प्रलंबित तांत्रिक प्रश्न त्वरित मार्गी लावण्याच्या सूचना त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या.
पर्यटन आणि रोजगारावर भर:
पाहणी दरम्यान खासदार सुनील तटकरे म्हणाले की, "श्रीवर्धनचा कायापालट जागतिक स्तरावरील 'ब्ल्यू फ्लॅग' मानांकनाच्या धर्तीवर करण्यात येत आहे. या विकासकामामुळे स्थानिक भूमिपुत्रांना रोजगाराच्या नवीन संधी उपलब्ध होतील आणि श्रीवर्धन हे पर्यटनाच्या नकाशावर अधिक ठळकपणे उमटेल".कामाचा दर्जा आणि गती यावर विशेष लक्ष देण्याचे निर्देश त्यांनी यावेळी प्रशासनाला दिले.
या पाहणी दौऱ्यावेळी माजी आमदार तुकाराम सुर्वे,पक्षाचे जिल्हा उपाध्यक्ष मोहमद मेमन,मतदार संघ अध्यक्ष उदय बापट,तालुका अध्यक्ष मंदार तोडणकर,महिला अध्यक्ष सबा फिरफिरे,प्रांताधिकारी महेश पाटील,मुख्याधिकारी विराज लबडे ,पोलीस निरीक्षक सुरेंद्र गरड,नगराध्यक्ष अतुल चौगले, उपनगराध्यक्ष अनंत गुरव,माजी नगराध्यक्ष बाळा सातनाक,सभापती सूचिन कीर माजी सभापती बाबुराव चोरगे यांच्यासह नगरसेवक पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते