अंधश्रद्धेचा काळा खेळ; भोंदू महाराजाकडून महिलेचे लैंगिक शोषण

Digital India
0


*दैवी शक्तीचा धाक दाखवत अत्याचार; जादूटोणा प्रतिबंधक कायद्यांतर्गत गुन्हा, आणखी पीडितांना पुढे येण्याचे आवाहन*


 तालुका प्रतिनिधी

 : निफाड तालुक्यातील धारणगाव (खडक) येथे अंधश्रद्धेचा गैरफायदा घेत एका भोंदू महाराजाने महिलेचे लैंगिक शोषण केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या प्रकरणी लासलगाव पोलीस ठाण्यात महेशगिरी ऊर्फ महेश दिलीप काकडे (वय अंदाजे ३१, रा. धारणगाव खडक) याच्याविरुद्ध बलात्कारासह महाराष्ट्र नरबळी व अघोरी प्रथा प्रतिबंधक कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पीडित महिला (वय २८, रा. उत्तम नगर, नाशिक) हिने दिलेल्या फिर्यादीनुसार, वैवाहिक आयुष्यातील अपयश आणि मानसिक ताणतणावामुळे ती अस्वस्थ होती. याच अवस्थेचा फायदा घेत तिच्या आई-वडिलांनी तिला धारणगाव येथील एका तथाकथित मठात नेले. तेथे आरोपी स्वतःमध्ये दैवी शक्ती असल्याचा दावा करत ‘करणीबाधा’ काढण्याचे नाटक करीत होता.

दि. १५ ऑगस्ट २०२४ रोजी मठात गेल्यानंतर आरोपीने महिलेच्या अंगात करणीबाधा असल्याचे सांगत विविध विधी करण्यास भाग पाडले. त्यानंतर मोबाईल क्रमांक घेत वारंवार अश्लील व वैयक्तिक संदेश पाठवण्यास सुरुवात केली. पुढे दि. २३ ऑगस्ट रोजी पंचवटी परिसरात भेटीस बोलावून आरोपीने तिला त्र्यंबकेश्वर रोडवरील एका लॉजवर नेले. तेथे ‘माझ्याकडे दैवी शक्ती आहे’ अशी भीती दाखवत तिच्यावर बळजबरीने लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप आहे. तसेच तिचे विवस्त्र फोटो काढून धमकावल्याचेही फिर्यादीत नमूद आहे.

घटनेनंतर पीडित महिला मानसिक धक्क्यात होती. आरोपीचा प्रभाव आणि कुटुंबीयांची भीती यामुळे तिने तक्रार देण्यास टाळाटाळ केली. दरम्यान, आरोपीने तिच्या मोबाईलमधील पुरावेही डिलीट केल्याचे समोर आले आहे. नंतर पीडितेचे लग्न झाले, मात्र आरोपीच्या प्रभावशाली ओळखीमुळे ती गप्प राहिली.

अखेर अंधश्रद्धा निर्मूलन चळवळीच्या कार्यकर्त्यांनी धीर दिल्यानंतर पीडित महिला व तिच्या पतीने लासलगाव पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली. सहाय्यक पोलीस निरीक्षक दिपक पाटील यांनी तपास करून गुन्हा नोंदवला आहे.

दरम्यान, आरोपीने अशाच प्रकारे इतर महिलांनाही जाळ्यात ओढले असण्याची शक्यता व्यक्त होत असून, आणखी पीडित महिलांनी पुढे येऊन तक्रार नोंदवावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

Post a Comment

0 Comments
Post a Comment (0)

Made with Love by

Digital India News
Connecting India To New World Of Digital Energy
To Top