विजेचा धक्का लागलेल्या शेतकऱ्याला लातूरला नेताना प्रकार; खाजगी रुग्णवाहिकेतून अखेर हलवले, संतापाची लाट

Digital India
0


लातूर ग्रामीण

मुरुड येथे महाराष्ट्र आपत्कालीन वैद्यकीय सेवा (108) रुग्णवाहिकेतील गंभीर निष्काळजीपणाचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. विजेचा धक्का लागून गंभीर भाजलेल्या तरुण शेतकऱ्याला उपचारासाठी लातूरला नेत असताना भर रस्त्यातच रुग्णवाहिकेचा खालचा रॉड तुटून गाडी बंद पडली. परिणामी, अत्यवस्थ रुग्णाला तब्बल अर्धा तास 38 अंश तापमानाच्या कडक उन्हात वेदनांनी तळमळत पडून राहावे लागले.

ही घटना शनिवारी (दि. 25 एप्रिल) दुपारी सुमारे 2 वाजता मुरुड बस स्थानकाजवळ घडली. वाठवडा (ता. कळंब) येथील बालाजी कोकाटे हे शेतात काम करत असताना अचानक विजेचा धक्का बसला. या अपघातात त्यांचे दोन्ही हात, छाती, पोट व पायाजवळील भाग गंभीररीत्या भाजला. त्यांना तातडीने मुरुड ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले.

प्राथमिक उपचारानंतर डॉक्टरांनी त्यांना पुढील उपचारासाठी लातूर येथे हलवण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार दुपारी 2 वाजण्याच्या सुमारास 108 रुग्णवाहिकेतून त्यांना रवाना करण्यात आले. मात्र रुग्णालयापासून अवघ्या 200 मीटर अंतरावर असलेल्या बस स्थानकाजवळ अचानक रुग्णवाहिकेचा खालचा भाग तुटून रस्त्यावर पडला आणि गाडी ठप्प झाली.

   प्रखर उन्हात रुग्णाची अवस्था अधिकच गंभीर होत होती. चालक व सोबत असलेले डॉक्टर पाटील यांनी नातेवाईकांच्या मदतीने रुग्णवाहिका रस्त्याच्या बाजूला घेतली. मात्र दुसरी रुग्णवाहिका येण्यात विलंब होत असल्याने परिस्थिती अधिकच चिंताजनक बनली.

दरम्यान, घटनेची माहिती मिळताच युवक काँग्रेसचे बाबा सवासे, सूरज कांबळे, समाधान गायकवाड व त्यांच्या सहकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी तात्काळ 108 च्या वरिष्ठांशी संपर्क साधून पर्यायी रुग्णवाहिकेची मागणी केली. प्रतिसाद उशिरा मिळत असल्याचे लक्षात येताच त्यांनी तत्परता दाखवत खाजगी रुग्णवाहिका बोलावली आणि गंभीर रुग्णाला तातडीने लातूर येथे हलवले.

या घटनेमुळे परिसरात तीव्र संताप व्यक्त होत असून, “ही केवळ निष्काळजीपणा नाही, तर रुग्णांच्या जीवाशी खेळ आहे,” अशी प्रतिक्रिया नागरिकांकडून उमटत आहे. संबंधित यंत्रणेवर तात्काळ व कठोर कारवाई करण्याची मागणी जोर धरत आहे.


Post a Comment

0 Comments
Post a Comment (0)

Made with Love by

Digital India News
Connecting India To New World Of Digital Energy
To Top