प्रकरण दडपण्यासाठी हालचाली उघड; कृष्णा चांदगुडे यांची इंदिरानगर पोलिसांत तक्रार, कठोर कारवाईची मागणी
निफाड प्रतिनिधी :-
निफाड तालुक्यातील धारणगाव खडक येथील भोंदू महेशगिरी उर्फ महेश काकडे याच्याविरोधात दाखल झालेल्या गुन्ह्यानंतर या प्रकरणाला आता नवे वळण लागले आहे. प्रकरण मिटवून घेण्यासाठी महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे राज्य कार्यवाह कृष्णा चांदगुडे यांना लाच देण्याचा प्रयत्न झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. याप्रकरणी चांदगुडे यांनी इंदिरानगर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.
महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या पाठपुराव्यामुळे भोंदू महेशगिरी काकडे याच्याविरोधात जादूटोणा प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर पोलिसांनी त्याला अटक करून पाच दिवसांची पोलिस कोठडी मिळवली होती. या कारवाईनंतर त्याचा तथाकथित दरबार बंद पडला.
या कारवाईमुळे संतप्त झालेल्या महेशगिरीच्या निकटवर्तीयांनी प्रकरण मागे घेण्यासाठी हालचाली सुरू केल्या. महेशगिरीच्या भाच्याने एका राजकीय पक्षाच्या कार्यकर्त्यामार्फत कृष्णा चांदगुडे यांच्याशी संपर्क साधला. शुक्रवार दि. २४ एप्रिल रोजी सायंकाळी ६.५६ वाजता मोबाईलवर संपर्क साधून सुरुवातीला सामान्य चर्चा करण्यात आली. त्यानंतर प्रत्यक्ष भेट घेण्याची इच्छा व्यक्त करण्यात आली. मात्र, चांदगुडे यांनी स्पष्ट नकार देत, “जे काही बोलायचे आहे ते फोनवरच बोला,” असे सांगितले.
यावेळी संबंधित व्यक्तीने महेशगिरीचे प्रकरण मिटवून घेण्यासाठी पैसे देण्याची तयारी असल्याचे सांगितले. हा प्रस्ताव ऐकताच चांदगुडे यांनी संबंधितास खडसावले. त्यानंतर त्यांनी तत्काळ अंनिसच्या सहकाऱ्यांना तसेच इंदिरानगर पोलिस ठाण्याचे प्रभारी पोलिस निरीक्षक मनोहर कारंडे यांना माहिती दिली आणि नंतर लेखी तक्रार दाखल केली.
या घटनेमुळे अंधश्रद्धा निर्मूलन चळवळीतील कार्यकर्त्यांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. लाच देण्याचाही गुन्हा तितकाच गंभीर असल्याने संबंधितांवर कठोर कारवाई करण्याची मागणी होत आहे. पोलिसांनी तक्रारीची दखल घेत पुढील कारवाई सुरू केल्याचे सांगितले.
*“लाच घेण्याप्रमाणे लाच देणे हाही गुन्हाच आहे. या प्रकारामुळे माझ्या आणि चळवळीच्या सामाजिक प्रतिष्ठेवर प्रश्नचिन्ह निर्माण करण्याचा प्रयत्न झाला. भविष्यात असे प्रकार होऊ नयेत, यासाठीच तक्रार दाखल केली आहे.”* कृष्णा चांदगुडे, राज्य कार्यवाह, महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती
