वणी प्रतिनिधी:- रितेश पारख
म.वि.प्र. समाजाच्या के.आर.टी. कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, वणी येथे जागतिक पुस्तक दिनानिमित्त मराठी विभाग व ग्रंथालय विभागाच्या संयुक्त विद्यमाने विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.कार्यक्रमाच्या प्रारंभी डॉ. के. आर. आढाव यांनी प्रास्ताविक करताना जागतिक पुस्तक दिनाचे महत्त्व विशद केले. पुस्तके ही ज्ञान, संस्कार आणि विचारांची खरी संपत्ती असून विद्यार्थ्यांनी नियमित वाचनाची सवय लावावी, असे आवाहन त्यांनी केले.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस. एस. काळे उपस्थित होते. अध्यक्षीय मनोगतात त्यांनी पुस्तकांमुळे व्यक्तिमत्त्व विकास घडतो, विचारांना दिशा मिळते आणि समाज परिवर्तनासाठी वाचन संस्कृती अत्यंत आवश्यक असल्याचे सांगितले. विद्यार्थ्यांनी ग्रंथालयाचा अधिकाधिक उपयोग करून ज्ञानार्जन करावे, असेही ते म्हणाले.यावेळी डॉ. वाय. एम. साळुंके यांनी इतिहास विभागामार्फत सामंजस्य करार (MoU) अंतर्गत विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या ‘भारतीय संविधानात महिलांचा सहभाग’ या प्रकल्पाविषयी सविस्तर माहिती दिली.यानंतर प्राचार्य डॉ. एस. एस. काळे यांच्या हस्ते या प्रकल्प पुस्तकाचे विमोचन करण्यात आले. विद्यार्थ्यांच्या संशोधनवृत्तीला चालना देणारा हा उपक्रम असल्याचे मत यावेळी व्यक्त करण्यात आले.
कार्यक्रमानिमित्त ग्रंथालय विभागातर्फे पुस्तक प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते. प्रदर्शनास विद्यार्थी, प्राध्यापक व कर्मचाऱ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.कार्यक्रमास शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.
