प्रतिनिधी/संदीप लाड
राज्य शासनाच्या २५१५ जन सुविधा योजने अंतर्गत मंजूर करण्यात आलेल्या मौजे गालसुरे काठी येथील पेवर ब्लॉक रस्त्याचे उद्घाटन हनुमान जयंतीच्या शुभ मुहूर्तावर उत्साहात संपन्न झाले. भारतीय जनता पक्षाचे माजी आमदार पंडितशेठ पाटील, नेते प्रशांत शिंदे आणि माजी सरपंच अखलाख माहिमकर यांच्या विशेष पाठपुराव्यातून हा निधी उपलब्ध झाला असून, ग्रामस्थांची अनेक वर्षांची मागणी आता पूर्ण झाली आहे.
या रस्त्याच्या उद्घाटन प्रसंगी भाजप नेते प्रशांत शिंदे यांची प्रमुख उपस्थिती होती. तसेच माजी सरपंच अखलाख माहिमकर, गालसुरे काठी ग्रामस्थ मंडळाचे अध्यक्ष रामकृष्ण मांजरेकर ग्रामपंचायत सदस्य चलेंद्र पोलेकर आणि अशोक आंजर्लेकर हे मान्यवर सन्माननीय अतिथी म्हणून उपस्थित होते.विकासाचा शब्द पूर्ण:२५१५ जन सुविधा योजनेच्या माध्यमातून गावागावांत मूलभूत सोयीसुविधा पोहोचवण्याचे काम सुरू आहे. माजी आमदार पंडितशेठ पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आणि प्रशांत शिंदे व अखलाख माहिमकर यांच्या प्रयत्नांमुळे गालसुरे काठी येथील हा रस्ता पेवर ब्लॉकने सुसज्ज झाला आहे. यामुळे आता पावसाळ्यात होणारा चिखलाचा त्रास कायमचा दूर झाला आहे.
मान्यवरांचे प्रतिपादन:यावेळी बोलताना मान्यवरांनी सांगितले की, "हनुमान जयंतीसारख्या पवित्र दिवशी लोकहिताचे काम जनतेला समर्पित करताना आनंद होत आहे. जन सुविधा योजनेचा निधी योग्य ठिकाणी विनियोग करून आम्ही गालसुरे गावाचा कायापालट करण्यासाठी कटिबद्ध आहोत."या कार्यक्रमाला गालसुरे ग्रामस्थ मंडळाचे पदाधिकारी, स्थानिक कार्यकर्ते आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
