वार्ताहर
: पावसाळ्यात वादळी वाऱ्यांमुळे अवाढव्य जाहिरात होर्डिंग कोसळण्याचे प्रकार घडू नयेत यासाठी 'सिडको'ने अनधिकृत होर्डिंग विरोधात कठोर भूमिका घेत, सदरचे होर्डीग जमीनदोस्त करण्याची कारवाई हाती घेतली. त्यामुळे अनधिकृतपणे होडींग उभारुन बेकायदेशीररित्या जाहिरातबाजी करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत.
'सिडको' च्या हद्दीत नैनासह इतर भागामध्ये 'सिडको'च्या नियमावलीचे उल्लंघन करुन तसेच कोणतीही अधिकृत परवानगी न घेता अनेक ठिकाणी अवाढव्य असे जाहिरात होर्डीग उभारण्यात आले आहेत. सदरचे होर्डीग महामार्गालगत असल्याने वादळी वाऱ्याच्या काळात ते अपघाताला कारणीभूत ठरु शकतात. सदरचा धोका ओळखून 'सिडको'च्या अनधिकृत बांधकामे (नैना) विभागामार्फत विनापरवाना उभारण्यात आलेले अवाढव्य जाहिरात फलक हटविण्याची कारवाई करण्यात आली. मुंबई-राष्ट्रीय महामार्गालगत पनवेल पळस्पे येथील खंडोबा हॉटेलसमोर तसेच अरिहंत बिल्डिंग जवळ उभारलेल्या अनधिकृत जाहिरात फलकधारकांना महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन-नगररचना अधिनियम, १९६६ अंतर्गत नोटिसा बजावण्यात आल्या होत्या. मात्र, संबंधितांनी फलक न काढल्याने अखेर 'सिडको' ने निष्कासन मोहीम राबवत सदर फलक हटवले. सदर कारवाई मुख्य दक्षता अधिकारी तथा पोलीस उपमहानिरीक्षक सुरेश मेंगडे यांच्या निर्देशानुसार आणि मुख्य नियंत्रक (अनधिकृत बांधकामे-नैना) प्रशांत भांगरे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. या मोहिमेत अतिक्रमण विभागाचे दत्तात्रय चौरे, जितेंद्र परदेशी, भूमापक शिवराज चव्हाण, स्थानिक पोलीस, सिडको पोलीस पथक, महावितरण अधिकारी, सिडको सुरक्षा रक्षक तसेच महाराष्ट्र सुरक्षा मंडळाच्या कर्मचाऱ्यांचा सहभाग होता.
