वाढत्या तापमानात उष्माघातापासून बचावासाठी सोपे घरगुती उपाय
वाशीम प्रतिनिधी
वाशिम : उन्हाळ्याच्या दिवसांत वाढत्या तापमानामुळे उष्णतेची लाट तीव्र होत असून उष्माघात (हीट स्ट्रोक) होण्याचा धोका मोठ्या प्रमाणात वाढत आहे. ही एक गंभीर व जीवघेणी अवस्था असून नागरिकांनी याबाबत विशेष सतर्कता बाळगावी, असे आवाहन ऑक्यूथेरपिस्ट तसेच आयुष इंटरनॅशनल मेडिकल असोसिएशन, वाशिमचे डॉ. कैलास कालापाड यांनी केले आहे.
सामान्यतः मानवी शरीराचे तापमान 98.6 फॅरेनहाइट (37°C) इतके असते. मात्र हे तापमान अत्याधिक वाढल्यास (हायपरथर्मिया) किंवा कमी झाल्यास (हायपोथर्मिया) शरीराच्या अवयवांवर दुष्परिणाम होऊ शकतो. उष्माघात म्हणजेच सनस्ट्रोक किंवा हीट स्ट्रोक ही अशीच एक धोकादायक स्थिती असून वेळेत उपचार न झाल्यास ती जीवघेणी ठरू शकते.
उष्माघात टाळण्यासाठी दुपारी 12 ते 3 या वेळेत बाहेर जाणे टाळावे. तापमान जास्त असताना बाहेर राहावे लागल्यास थकवणाऱ्या हालचाली टाळाव्यात आणि वेळोवेळी पाणी पिणे आवश्यक आहे. तहान लागली नसली तरीही शरीरात पाण्याची कमतरता होऊ नये यासाठी नियमित पाणी सेवन करावे.
घराबाहेर पडताना हलक्या रंगाचे, सैल व सुटसुटीत कपडे परिधान करावेत. डोळ्यांसाठी गॉगल्स, तसेच डोक्यावर टोपी किंवा छत्रीचा वापर करावा. पायात बूट किंवा चपला वापरणेही आवश्यक आहे. अल्कोहोल, चहा, कॉफी व कार्बोनेटेड पेये यामुळे शरीरातील पाण्याचे प्रमाण कमी होते, त्यामुळे अशा पेयांचे सेवन टाळावे.
उघड्यावर काम करणाऱ्यांनी विशेष काळजी घेऊन टोपी किंवा छत्रीचा वापर करावा. तसेच ओल्या कापडाने डोके, मान, चेहरा व हात-पाय पुसल्यास शरीराला थंडावा मिळतो. चक्कर येणे, अशक्तपणा जाणवणे किंवा तब्येत बिघडल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.
उन्हाळ्यात शरीरातील पाण्याचे प्रमाण टिकवून ठेवण्यासाठी लस्सी, तांदळाचे पाणी, लिंबू सरबत, टरबूज, द्राक्षे, नारळ पाणी आणि ताक यांसारख्या घरगुती पेयांचे सेवन करणे फायदेशीर ठरते.
उष्णतेच्या वाढत्या तीव्रतेच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी योग्य काळजी घेऊन स्वतःचे आरोग्य सुरक्षित ठेवणे अत्यंत गरजेचे असल्याचे डॉ. कैलास कालापाड यांनी सांगितले.
