श्रीवर्धन नगरपरिषदेत कंत्राटी सफाई कामगारांचा बेमुदत संपाचा इशारा

Digital India
0


प्रतिनिधी/संदीप लाड 

श्रीवर्धन नगरपरिषदेत कार्यरत असलेल्या कंत्राटी सफाई कामगारांनी प्रशासनाविरोधात तीव्र नाराजी व्यक्त करत आपल्या प्रलंबित मागण्यांसाठी बेमुदत कामबंद आंदोलनाचा इशारा दिला आहे. कामगारांनी दिनांक ८ एप्रिल २०२६ पासून संप सुरू करण्याचा निर्णय घेतला असून, मागण्या मान्य न झाल्यास आंदोलन सुरूच ठेवण्याचा इशारा दिला आहे.

कामगारांनी नगराध्यक्ष, मुख्याधिकारी, सभापती, पोलिस प्रशासन तसेच जिल्हाधिकारी आणि कामगार आयुक्त कोकण विभाग यांना निवेदन सादर करून आपल्या विविध समस्यांकडे लक्ष वेधले आहे. अनेक महिन्यांपासून आर्थिक शोषण होत असल्याचा आरोप करत त्यांनी प्रशासनाच्या दुर्लक्षाचा निषेध केला आहे

कामगारांच्या निवेदनात, शासनाच्या टेंडरनुसार दररोज ६२७ रुपये मजुरी मंजूर असताना प्रत्यक्षात केवळ ३३३ रुपये दिले जात असल्याची गंभीर बाब त्यांनी मांडली आहे. तसेच मागील दोन महिन्यांपासून वेतन थकित असून, त्यामुळे कुटुंबांवर उपासमारीची वेळ आल्याचे त्यांनी सांगितले.

याशिवाय, पीएफ, बोनस, सुट्ट्या यांसारख्या हक्काच्या सुविधांचा अभाव, “समान काम समान वेतन” या तत्त्वाची अंमलबजावणी न होणे, पगारवाढ न मिळणे, ईएसआय (मेडिकल) सुविधा व विमा संरक्षणाचा अभाव, तसेच कामाच्या ठिकाणी आवश्यक सुरक्षा साधनांची कमतरता या मुद्द्यांकडेही कामगारांनी लक्ष वेधले आहे.

कामगारांनी स्पष्ट केले आहे की, जोपर्यंत त्यांच्या मागण्या लेखी स्वरूपात मान्य होत नाहीत आणि थकीत वेतन अदा केले जात नाही, तोपर्यंत आंदोलन सुरूच राहील. दरम्यान, संप काळात शहरातील स्वच्छतेवर परिणाम झाल्यास त्यास पूर्णतः प्रशासन आणि संबंधित कंत्राटदार जबाबदार राहतील, असा इशाराही त्यांनी दिला आहे.

या पार्श्वभूमीवर प्रशासनाने तातडीने हस्तक्षेप करून कामगारांच्या मागण्यांवर सकारात्मक तोडगा काढावा, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.


Post a Comment

0 Comments
Post a Comment (0)

Made with Love by

Digital India News
Connecting India To New World Of Digital Energy
To Top