प्रतिनिधी/संदीप लाड
श्रीवर्धन च्या आमदार तथा महाराष्ट्र राज्याच्या महिला व बालविकास मंत्री आदितीताई तटकरे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून उपजिल्हा रुग्णालय श्रीवर्धन येथे महाआरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरात विविध आजारांबाबत मोफत तपासणी व तज्ञ डॉक्टरांचे मार्गदर्शन नागरिकांना उपलब्ध करून देण्यात आले.
या शिबिरामध्ये त्वचारोग, गुप्तरोग, मणक्याचे आजार, मधुमेह, रक्तदाब, थायरॉईड, हृदयरोग, नेत्रतपासणी तसेच कर्करोग अशा विविध आजारांवरील तपासणी करण्यात आली. तज्ज्ञ डॉक्टरांनी नागरिकांची तपासणी करून आवश्यक ते वैद्यकीय मार्गदर्शन दिले.
या उपक्रमासाठी तेरणा स्पेशालिटी हॉस्पिटल आणि वैद्यकीय महाविद्यालय नेरूळ येथील तज्ज्ञ डॉक्टरांचे विशेष सहकार्य लाभले. तसेच हे शिबिर राष्ट्रवादी काँग्रेस श्रीवर्धन तालुका व शहर यांच्या वतीने आयोजित करण्यात आले होते.
या महाआरोग्य शिबिराला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला असून ३५० पेक्षा जास्त नागरिकांनी या शिबिराचा लाभ घेतला. मोफत आरोग्य तपासणी आणि तज्ज्ञ डॉक्टरांचे मार्गदर्शन मिळाल्यामुळे नागरिकांनी या उपक्रमाचे स्वागत केले.
