मदतीसाठी धावले मुज्जू पटेल आणि उत्कर्ष फाउंडेशन:
घाटंजी-माणोली मार्गावर मंगळवारी (१७ मार्च) रात्री ७ वाजेच्या सुमारास झालेल्या एका भीषण दुचाकी अपघातात दोन तरुणांचा मृत्यू झाला. गजानन आडे (२६) आणि प्रज्वल कचाडे (२९, रा. आकपुरी) अशी मृत तरुणांची नावे आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, हे दोन्ही तरुण पल्सर गाडीने घाटंजीकडून माणोलीकडे जात होते. माणोली गावाजवळील वळणावर चालकाचे दुचाकीवरील नियंत्रण सुटले आणि गाडी विरुद्ध दिशेने येणाऱ्या वाहनावर जाऊन आदळली. हा अपघात इतका भीषण होता की, दोन्ही तरुण गंभीर जखमी झाले.
अपघाताची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी उत्कर्ष फाउंडेशनच्या रुग्णवाहिकेला आणि मुज्जू पटेल यांना फोन केला. मुज्जू पटेल यांनी आपल्या मित्रमंडळासह तातडीने घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी स्वतः रुग्णवाहिका चालवत जखमींना तातडीने घाटंजी ग्रामीण रुग्णालयात दाखल केले.
जखमींची प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांना पुढील उपचारासाठी यवतमाळच्या शासकीय रुग्णालयात हलवण्यात आले. मात्र, दुर्दैवाने एकाचा तिथेच मृत्यू झाला. दुसऱ्या तरुणाला तातडीने नागपूरला हलवण्यात आले होते, परंतु आज सकाळी उपचारादरम्यान त्यानेही प्राण सोडले.
आमदार राजू तोडसाम यांनी या घटनेची दखल घेत रुग्णालयात संपर्क साधून तातडीने उपचार करण्याच्या सूचना दिल्या होत्या आणि ते सतत परिस्थितीचा पाठपुरावा करत होते. या घटनेमुळे आकपुरी गावावर शोककळा पसरली आहे.
