वडघर-पांगळोली केंद्रस्तरीय क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धेत विद्यार्थ्यांचा डंका;सरपंच आदित्य कासरुंग यांच्याकडून कौतुक
प्रतिनिधी/ संदीप लाड
रायगड जिल्हा परिषद शाळा, गाणी येथे 'वडघर-पांगळोली' केंद्रस्तरीय क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धा अत्यंत उत्साहात पार पडल्या. या स्पर्धांच्या निमित्ताने विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळण्यासोबतच, शिक्षणासाठी आणि क्रीडा विकासासाठी सढळ हाताने मदत करणाऱ्या देणगीदारांचा विशेष सत्कार करून कृतज्ञता व्यक्त करण्यात आली.
मान्यवरांची उपस्थिती आणि दातृत्वाचा गौरव
कार्यक्रमाचे उद्घाटन आणि बक्षीस वितरण समारंभ मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झाला. यावेळी सरपंच आदित्य कासरुंग, केंद्रप्रमुख महेश दरिपकर, बाल गणेश मित्र मंडळाचे अध्यक्ष विश्वास खांडेकर, ग्रामपंचायत अधिकारी अभिजित माने यांच्यासह परिसरातील प्रतिष्ठीत नागरिक उपस्थित होते. या स्पर्धा यशस्वी करण्यासाठी ज्या दानशूर व्यक्तींनी आणि संस्थांनी मोलाचे योगदान दिले, त्यांचा मान्यवरांच्या हस्ते शाल, श्रीफळ आणि सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला.
सरपंच आदित्य कासरुंग यांनी करताना सांगितले की
"ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांमध्ये अफाट जिद्द आणि टॅलेंट आहे, त्यांना फक्त योग्य व्यासपीठाची गरज असते. आजच्या या केंद्रस्तरीय स्पर्धेच्या निमित्ताने ते व्यासपीठ उपलब्ध झाले असून, केवळ शिक्षकच नव्हे तर संपूर्ण गाव आणि देणगीदार या उपक्रमासाठी एकत्र आले आहेत, ही अभिमानाची गोष्ट आहे. समाजाच्या या दातृत्वामुळेच जिल्हा परिषद शाळांचा कायापालट होत असून,ग्रामपंचायत विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी सदैव खंबीरपणे पाठीशी उभी राहील.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शाळेचे मुख्याध्यापक योगेश भुसारे यांनी विशेष परिश्रम घेतले. त्यांच्या मार्गदर्शनाखाली केंद्रातील सर्व मुख्याध्यापक, उपशिक्षक, पालक आणि ग्रामस्थांनी एकजुटीने काम केले. मैदानी खेळांसोबतच सांस्कृतिक कार्यक्रमांमध्येही विद्यार्थ्यांनी आपला ठसा उमटवला. याप्रसंगी मोठ्या संख्येने पालक, ग्रामस्थ आणि विद्यार्थी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक आणि आभार प्रदर्शन मुख्याध्यापक योगेश भुसारे सर यांनी केले.
