वणी प्रतिनिधी:- रितेश पारख
वणी, दि. १९ फेब्रुवारी २०२६ – के. आर. टी. कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, वणी येथे आज छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. यानिमित्त महाराजांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
कार्यक्रमाच्या प्रारंभी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस. एस. काळे यांनी शिवाजी महाराजांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहिली. प्रास्ताविकपर भाषणात त्यांनी शिवरायांच्या बहुआयामी व्यक्तिमत्त्वावर प्रकाश टाकत त्यांच्या शौर्य, पराक्रम, सहिष्णुता व आदर्श शासनपद्धतीचे विवेचन केले. शिवाजी महाराजांनी मराठा साम्राज्याची मुहूर्तमेढ रोवून भारतीय इतिहासात स्वतंत्र व लोककल्याणकारी राज्यव्यवस्थेचा आदर्श निर्माण केला, असे त्यांनी नमूद केले. विजापूरची आदिलशाही, अहमदनगरची निजामशाही आणि मुघल साम्राज्याविरुद्ध त्यांनी दिलेला लढा हा स्वराज्य स्थापनेच्या ध्येयाने प्रेरित होता, असेही त्यांनी सांगितले.
स्थानिक व्यवस्थापन समितीचे सदस्य व महाविद्यालयाचे माजी उपप्राचार्य प्रा. आर. एल. पाटील यांनी शिवरायांच्या व्यक्तिमत्त्वातील विविध पैलू उलगडून सांगताना विद्यार्थ्यांनी त्यांच्या विचारांचे आत्मसात करून जीवनात आदर्श ठेवावा, असा मोलाचा सल्ला दिला. अॅड. शशिकांत क्षीरसागर यांनी आपल्या भाषणात शिवाजी महाराज हे स्वराज्याचे संस्थापक, कुशल प्रशासक, लोककल्याणकारी राजा आणि धर्मनिरपेक्षतेचे प्रतीक होते, असे प्रतिपादन केले.
महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. वाय. एम. साळुंके यांनी शिवाजी महाराजांच्या पत्रव्यवहाराचा संदर्भ देत त्यांच्या महिला व रयतेप्रती असलेल्या आदरभावनेचा तसेच व्यवहारातील चाणाक्ष नीतीचा विशेष उल्लेख केला.
या कार्यक्रमास महाविद्यालय स्थानिक किमान कौशल्य समितीचे अध्यक्ष मा. श्री. सतीश जाधव तसेच मा. श्री. शेटे सर मंचावर उपस्थित होते. आभार प्रदर्शन प्रा. गणेश पाटील यांनी केले. कार्यक्रमास विविध विभागांचे प्राध्यापक, प्राध्यापकेतर कर्मचारी तसेच मोठ्या संख्येने विद्यार्थी उपस्थित होते.
