प्रतिनिधी /संदीप लाड
श्रीवर्धन तालुक्यातील रानवली ग्रामपंचायतीने 'मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान' अंतर्गत एक आगळावेगळा उपक्रम राबवून गावच्या विकासात वैचारिक भर घातली आहे. ग्रामपंचायतीसमोरील पाराचे सुशोभीकरण करून त्यावर अभियानातील विविध घटकांवर आधारित प्रबोधनपर चित्रे रेखाटली आहेत. या 'बोलक्या पारा'वर आता ग्रामस्थांसाठी मराठी व उर्दू वृत्तपत्र वाचनालय सुरू करण्यात आले असून, याचे उद्घाटन नुकतेच उत्साहात पार पडले.
मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानाचा मुख्य उद्देश गावाला स्वयंपूर्ण आणि माहितीपूर्ण करणे हा आहे. हाच धागा पकडून ग्रामपंचायत प्रशासनाने कार्यालयासमोरील पाराचा कायापालट केला आहे.
बोलकी चित्रे: पारावर अभियानातील महत्त्वाच्या घटकांची चित्रे काढून जनजागृती करण्यात आली आहे.
वाचनालय: केवळ सुशोभीकरण न थांबवता, या पारावर ग्रामस्थांना चालू घडामोडींची माहिती मिळावी म्हणून मराठी आणि उर्दू भाषेतील वृत्तपत्रे उपलब्ध करून दिली आहेत. यामुळे गावात वाचन संस्कृती जोपासली जाणार आहे.
या अभिनव उपक्रमाचा शुभारंभ प्रसंगी रानवलीचे सरपंच श्री. सुरेश मांडवकर, उपसरपंच श्री. आताउल्ला जळगांवकर, तसेच श्री. राजू जाधव, ग्रामपंचायत अधिकारी श्री. अभिजित माने, आणि मुख्याध्यापक श्री. भिकू पांगरकर उपस्थित होते.
"गावाचा विकास हा केवळ भौतिक सुविधांनी होत नाही, तर विचारांच्या देवाणघेवाणीतून होतो. या वाचनालयाच्या माध्यमातून हिंदू-मुस्लिम ऐक्याचे दर्शन घडवत मराठी व उर्दू दोन्ही वृत्तपत्रे उपलब्ध करून दिली आहेत, जेणेकरून प्रत्येक ग्रामस्थ माहितीने समृद्ध होईल."
— ग्रामपंचायत प्रशासन, रानवली
ग्रामपंचायतीच्या या कल्पकतेचे आणि अधिकारी अभिजित माने यांच्या नियोजनाचे श्रीवर्धन तालुक्यात सर्वत्र कौतुक होत आहे. या उपक्रमामुळे ग्रामपंचायतीचा परिसर आता केवळ प्रशासकीय केंद्र न राहता ज्ञानाचे केंद्र बनला आहे.
