प्रतिनिधी /संदीप लाड
कोकण उन्नती मित्र मंडळ संचलित रवींद्र ना. राऊत इंग्लिश मिडीयम स्कूल, श्रीवर्धन येथे आज विद्यार्थ्यांसाठी भव्य कार्निवल आणि फूड फेस्टिवलचे आयोजन करण्यात आले होते. या अनोख्या उपक्रमात शाळेतील विद्यार्थ्यांनीच पुढाकार घेऊन विविध टेबलांवर घरगुती व चविष्ट खाद्यपदार्थ मांडले आणि त्यांची विक्री केली.
विद्यार्थ्यांच्या कल्पकतेला, व्यवस्थापन कौशल्याला आणि आत्मविश्वासाला चालना देणारा हा उपक्रम सर्वांच्याच विशेष पसंतीस उतरला. प्रत्येक टेबलावर वेगवेगळ्या पदार्थांची रेलचेल होती — स्नॅक्स, मिठाया, पेये अशा अनेक चवींचा आस्वाद उपस्थितांनी घेतला.
या फूड फेस्टिवलला सांस्कृतिक रंग चढवण्यासाठी स्वर गंधर्व यांचा सुमधुर गाण्यांचा कार्यक्रमही आयोजित करण्यात आला होता. या गाण्यांच्या मैफलीने वातावरण अधिकच आनंदी आणि उत्साही झाले. विद्यार्थी, शिक्षक तसेच पालकांनी या कार्यक्रमाचा मनमुराद आनंद घेतला.
एकूणच हा कार्निवल व फूड फेस्टिवल अत्यंत मजेत, शिस्तबद्ध आणि यशस्वीरीत्या पार पडला. शाळेच्या या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष अनुभवातून शिकण्याची संधी मिळाली असून शाळेच्या सर्वांगीण विकासात्मक दृष्टिकोनाचेही सुंदर दर्शन घडले
