वणी प्रतिनिधी:- रितेश पारख
मराठा विद्या प्रसारक समाजाच्या कर्मवीर रावसाहेब थोरात कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, वणी येथे राष्ट्रीय सेवा योजना (NSS) व विद्यार्थी विकास मंडळाच्या अंतर्गत शुक्रवार, दिनांक २३ ऑक्टोबर २०२६ रोजी ‘मुख्यमंत्री आरोग्य संवाद, जागर आरोग्याचा’ हा आरोग्य जनजागृतीपर कार्यक्रम उत्साहात पार पडला.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस. एस. काळे यांनी केले. त्यांनी आरोग्य जनजागृतीचे महत्त्व अधोरेखित करून विद्यार्थ्यांनी स्वतःच्या आरोग्याबरोबरच समाजाच्या आरोग्याबाबतही जागरूक राहण्याचे आवाहन केले. उपप्राचार्य डॉ. वाय. एम. साळुंके यांनी आपल्या मनोगतातून आरोग्यविषयक जागरूकता आणि सामाजिक जबाबदारी यांचे महत्त्व स्पष्ट केले.
कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते डॉ. प्रियांक कापडे यांनी व्यसनमुक्ती या विषयावर मार्गदर्शन केले. व्यसनांचे शारीरिक, मानसिक व सामाजिक दुष्परिणाम स्पष्ट करत त्यांनी तरुणांनी व्यसनांपासून दूर राहावे, व्यसनाधीन व्यक्तींना योग्य मदत मिळवून द्यावी आणि निरोगी जीवनशैलीचा स्वीकार करावा, असे आवाहन केले.
तसेच डॉ. तुषार दुसाने यांनी एड्स व क्षयरोग या विषयांवर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. या आजारांविषयी योग्य माहिती, प्रतिबंधात्मक उपाय, वेळेवर तपासणी आणि उपचारांचे महत्त्व त्यांनी विशद केले. समाजातील गैरसमज दूर करून आरोग्यविषयक वैज्ञानिक दृष्टिकोन विकसित करण्याची गरजही त्यांनी अधोरेखित केली.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. एस. बी. लोखंडे यांनी केले, तर आभार प्रदर्शन प्रा. वाय. आर. मोहन यांनी केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी कनिष्ठ महाविद्यालयाचे राष्ट्रीय सेवा योजना अधिकारी प्रा. प्रवीण महाले यांनी विशेष परिश्रम घेतले.
यावेळी प्राध्यापक राजेश गांगुर्डे, प्रा. किरण डेरे यांच्यासह महाविद्यालयातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. आरोग्यविषयक जागरूकता निर्माण करणे, व्यसनमुक्तीचा संदेश देणे आणि विद्यार्थ्यांमध्ये निरोगी जीवनशैलीबाबत सकारात्मक दृष्टिकोन विकसित करणे, हा या कार्यक्रमाचा प्रमुख उद्देश होता. मुख्यमंत्री आरोग्य संवाद कार्यक्रमात मार्गदर्शन करतांना डॉ. प्रियांक गडाख
