३ लाख ९१ हजारांचा मुद्देमाल जप्त ऑफिसर चॉइस ब्लू व रॉयल स्टॅगच्या नावाने बनावट दारू तयार करून विक्रीचा प्रयत्न; दोघांविरुद्ध गुन्हा दाखल
वणी प्रतिनिधी: रितेश पारख
वणी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील अंबानेर शिवारातील हॉटेल मल्हार येथे बनावट विदेशी दारू तयार करून विक्री करण्याच्या उद्देशाने साठा केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. वणी पोलिसांनी केलेल्या कारवाईत विदेशी दारूच्या विविध ब्रँडच्या लेबल असलेल्या एकूण ६९९ सिलबंद बाटल्या, २० लिटर रसायन, रिकाम्या बाटल्या, दारू तयार करण्यासाठी वापरले जाणारे साहित्य, अल्टो कार आणि मोबाइल असा एकूण ३ लाख ९१ हजार ७४६ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. याप्रकरणी सुमित अशोक कदम (वय ३२, रा. कोराटे, ता. दिंडोरी) आणि ज्ञानेश्वर नंदू नाठे (रा. निलवंडीपाडा, ता. दिंडोरी) यांच्याविरुद्ध वणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २४ ऑक्टोबर२६ रोजी रात्री एक वाजण्याच्या सुमारास अंबानेर शिवारातील हॉटेल मल्हार येथे ही कारवाई करण्यात आली. संबंधितांकडे दारू निर्मिती व विक्रीसाठी आवश्यक परवाना नसताना ऑफिसर चॉइस ब्लू आणि रॉयल स्टॅग या ब्रँडच्या नावाने लेबल लावलेल्या बाटल्यांमध्ये बनावट विदेशी दारू तयार करून विक्री करण्याच्या उद्देशाने साठा केल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे.
या कारवाईत ऑफिसर चॉइस ब्लू कंपनीच्या १८० मिली क्षमतेच्या ३६५ सिलबंद बाटल्या, ज्यांची किंमत ६० हजार ३०० रुपये, तर रॉयल स्टॅग कंपनीच्या ३३४ सिलबंद बाटल्या, ज्यांची किंमत ५८ हजार ७५० रुपये आहे, असा दारूसाठा जप्त करण्यात आला. याशिवाय २० लिटर रसायन असलेला प्लास्टिकचा कॅन, रॉयल स्टॅगच्या १८० आणि ऑफिसर चॉइस ब्लूच्या ३२ रिकाम्या बाटल्या, दारू तयार करण्यासाठी वापरले जाणारे साहित्य, ग्रे रंगाची अल्टो कार आणि मोबाइल असा मुद्देमाल पोलिसांनी ताब्यात घेतला आहे.
या प्रकरणी पोलीस कॉन्स्टेबल तुषार शाम सोनवणे यांनी फिर्याद दिली असून, वणी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. नाशिक जिल्हा ग्रामिण पोलिस अधिक्षक व उप विभागीय उपअधिक्षक कळवण यांच्या सुचने नुसार वणी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक हेमंत फड यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. या प्रकरणाचा पुढील तपास वणी पोलीस करीत असून, जप्त केलेल्या दारूची सत्यता, रसायनाचे स्वरूप आणि या प्रकरणामागे आणखी कोणाचा सहभाग आहे का, याबाबत तपास सुरू आहे.
