कसबे वणीच्या युवा नेत्याची राष्ट्रीय स्तरावर झेप

Digital India
0


नाशिक जिल्ह्यातील कसबे वणी येथील वंचित बहुजन युवा आघाडीचे युवा नेते तथा जिल्हा महासचिव 'संविधान गांगुर्डे' यांची इंडियन स्कूल ऑफ डेमोक्रसी (ISD) आयोजित 'द गुड पॉलिटिशियन २०२६' या राष्ट्रीय नेतृत्व विकास प्रशिक्षण कार्यक्रमासाठी निवड झाली आहे. देशभरातून सामाजिक आणि राजकीय क्षेत्रात तळागाळात काम करणाऱ्या निवडक युवा नेत्यांची या प्रतिष्ठित कार्यक्रमासाठी निवड करण्यात येते.नऊ महिन्यांच्या या प्रशिक्षण कार्यक्रमामध्ये सहभागी युवा नेत्यांना लोकशाही व्यवस्था, सार्वजनिक धोरणे, निवडणूक प्रक्रिया, प्रभावी नेतृत्व, जनतेशी संवाद, संघटन उभारणी, निवडणूक नियोजन, धोरणनिर्मिती आणि लोकप्रतिनिधी म्हणून जबाबदाऱ्या पार पाडण्यासाठी आवश्यक कौशल्यांचे प्रशिक्षण दिले जाणार आहे. याशिवाय देशातील विविध राज्यांतील सामाजिक व राजकीय क्षेत्रात कार्यरत असलेल्या युवा नेतृत्वासोबत संवाद साधण्याची, अनुभवांची देवाणघेवाण करण्याची आणि एकमेकांकडून शिकण्याची संधीही या कार्यक्रमातून मिळणार आहे.संविधान गांगुर्डे हे गेल्या अनेक वर्षांपासून सामाजिक न्याय, संविधानिक मूल्ये, युवकांचे संघटन, शिक्षण, तसेच वंचित, उपेक्षित आणि दुर्लक्षित घटकांच्या प्रश्नांवर सातत्याने कार्यरत आहेत. विविध सामाजिक उपक्रम, जनआंदोलने आणि संघटनात्मक कामातून त्यांनी आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. त्यांच्या या सातत्यपूर्ण सामाजिक व राजकीय कार्याची दखल घेत इंडियन स्कूल ऑफ डेमोक्रसीने त्यांची या राष्ट्रीय स्तरावरील नेतृत्व विकास कार्यक्रमासाठी निवड केली आहे.

निवडीबद्दल प्रतिक्रिया व्यक्त करताना संविधान गांगुर्डे म्हणाले, "भारतासारख्या विविधतेने नटलेल्या देशात लोकशाही अधिक सक्षम करण्यासाठी तत्त्वनिष्ठ आणि संवेदनशील नेतृत्वाची गरज आहे. 'द गुड पॉलिटिशियन 2026' या कार्यक्रमातून मिळणारे मार्गदर्शन, अनुभव आणि प्रशिक्षण जनतेसाठी अधिक जबाबदारीने काम करण्यास निश्चितच उपयोगी पडेल. या माध्यमातून मिळणारे ज्ञान सामाजिक न्याय, समता आणि संविधानिक मूल्यांच्या बळकटीसाठी वापरण्याचा माझा प्रयत्न असेल."

संविधान गांगुर्डे यांच्या या निवडीचे सामाजिक, शैक्षणिक आणि राजकीय क्षेत्रात स्वागत होत असून विविध मान्यवर, कार्यकर्ते आणि नागरिकांनी त्यांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत. त्यांच्या या यशामुळे कसबे वणीसह नाशिक जिल्ह्याच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेल्याची भावना व्यक्त होत आहे.



Tags

Post a Comment

0 Comments
Post a Comment (0)

Made with Love by

Digital India News
Connecting India To New World Of Digital Energy
To Top