जळगाव : शहरातील पिंप्राळा परिसरात संपत्तीच्या कागदपत्रांवरून झालेल्या वादातून भावजयीची कुऱ्हाडीने हत्या केल्याप्रकरणी आरोपी दीपक लोटन सोनार याला जळगाव सत्र न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा आणि १० हजार रुपये दंड ठोठावला.
ही घटना २१ मे २०२१ रोजी रात्री सुमारे ९.१५ वाजता पिंप्राळा येथील मयूर कॉलनी परिसरात घडली होती. आरोपी दीपक सोनार आणि त्याची भावजय योगिता सोनार यांच्यात संपत्तीच्या कागदपत्रांवरून वाद झाला. वादाचे रूपांतर हाणामारीत झाले आणि आरोपीने योगिता यांच्या डोक्यावर कुऱ्हाडीने वार केल्याने त्यांचा मृत्यू झाला.
या प्रकरणात मृत महिलेचा मुलगा आर्यन सोनार हा प्रत्यक्षदर्शी साक्षीदार ठरला. त्याच्यासह एकूण १७ साक्षीदारांची साक्ष तपासण्यात आली. उपलब्ध पुरावे व साक्षींच्या आधारे न्यायालयाने आरोपीला दोषी ठरवत जन्मठेपेची शिक्षा सुनावली.
शिक्षा सुनावताना आईच्या आठवणीने आर्यनला न्यायालयात अश्रू अनावर झाले. या प्रकरणात सरकारी पक्षातर्फे जिल्हा सरकारी वकील सुरेंद्र काबरा यांनी प्रभावी युक्तिवाद केला. तपास पोलीस निरीक्षक अनिल बडगुजर यांनी केला.
न्यायालयाच्या या निर्णयामुळे संपत्तीच्या वादातून घडलेल्या या हत्येप्रकरणी न्याय मिळाल्याची भावना व्यक्त होत आहे.
