प्रतिनिधी / संदीप लाड
मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानांतर्गत 'निसर्गसंपन्न व प्रदूषणमुक्त ग्रामपंचायत' या संकल्पनेवर आधारित तालुकास्तरीय मूल्यमापन समितीने नुकतीच कारिवणे ग्रामपंचायतीला भेट दिली. यावेळी कागलचे गटविकास अधिकारी श्री. कुलदीप बोंगे साहेब यांचे ग्रामपंचायतीच्या वतीने उत्साहात स्वागत करण्यात आले.
या मूल्यमापन प्रक्रियेदरम्यान समितीने ग्रामपंचायतीमार्फत राबवण्यात आलेल्या विविध विकासकामांची आणि पर्यावरणपूरक उपक्रमांची पाहणी केली. गावातील स्वच्छता, सांडपाणी व्यवस्थापन आणि वृक्षारोपणासारख्या कामांचे समितीकडून कौतुक करण्यात आले.
या प्रसंगी श्रीवर्धन पंचायत समितीचे माजी सभापती बाबुराव चोरगे, पंचायत समिती सदस्या सौ. अस्मिता चोरगे, कारिवणे ग्रामपंचायतीच्या सरपंच सौ. गीता चोरगे, ग्रामसेवक अभिजित माने, अक्षय चोरगे यांच्यासह ग्रामपंचायत सदस्य उपस्थित होते. या महत्त्वपूर्ण कार्यक्रमासाठी गावातील ग्रामस्थ आणि महिला भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
ग्रामपंचायतीला आदर्श आणि प्रदूषणमुक्त करण्यासाठी सर्वांनी एकजुटीने प्रयत्न करण्याचे आवाहन यावेळी उपस्थित मान्यवरांनी केले
