जावेळे येथे बिबट्याच्या हल्ल्यानंतर वनविभागाची रात्रंदिवस गस्त;-ग्रामस्थांना सतर्क राहण्याचे आवाहन

Digital India
0


प्रतिनिधी/संदीप लाड

श्रीवर्धन तालुक्यातील जावेळे गावामध्ये गेल्या काही दिवसांपूर्वी बिबट्याने पाळीव गुरांचा फडशा पाडल्याची खळबळजनक घटना घडली होती. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात भीतीचे वातावरण असून, ग्रामस्थांच्या सुरक्षिततेसाठी वनविभागाने आता कंबर कसली आहे. वनविभागाच्या विशेष पथकाद्वारे जावेळे परिसरात रात्रंदिवस गस्त (Patrolling) सुरू करण्यात आली आहे.

वनविभागाचे पथक तैनात:

बिबट्याचा वावर असलेल्या भागात वनपाल ईश्वर देवकते, वनपाल प्रशांत गायकर, वनरक्षक अगंद नागरजोगे, वनरक्षक जहिद गटबकर आणि वनरक्षक विलास ननावरे हे अधिकारी व कर्मचारी प्रत्यक्ष ग्राऊंडवर उतरले आहेत.यावेळी सरपंच मनोहर सावंत व परिसरातील ग्रामस्थ उपस्थित होते हे पथक बिबट्याच्या पावलांच्या ठशांवरून त्याच्या हालचालींचा मागोवा घेत असून, नागरिकांशी संवाद साधून त्यांना धीर देत आहे.

वनविभागाचे ग्रामस्थांना विशेष मार्गदर्शन व आवाहन:

बिबट्याचा धोका टाळण्यासाठी वनपाल ईश्वर देवकते आणि प्रशांत गायकर यांनी ग्रामस्थांसाठी खालील महत्त्वाच्या सूचना जारी केल्या आहेत: 

१. गोठ्यांची सुरक्षा: बिबट्याने गुरांवर हल्ला केल्यामुळे, पशुपालकांनी आपले गोठे जाळी लावून पूर्णपणे बंदिस्त करावेत. रात्रीच्या वेळी गोठ्यात प्रखर दिवे (Focus Lights) लावावेत.

२. समूहाने प्रवास करा: शेतात किंवा जंगलाच्या दिशेने जाताना किमान ४-५ जणांच्या गटाने जावे. सोबत काठी, बॅटरी आणि आवाजासाठी रेडिओ किंवा मोबाईलवर गाणी वाजवावीत.

३. लहान मुलांची काळजी: सायंकाळी ६ नंतर लहान मुलांना घराबाहेर एकटे सोडू नका. घराचा दरवाजा बंद ठेवावा.

४. परिसराची स्वच्छता: घराभोवती वाढलेली झाडेझुडपे काढून टाकावीत, जेणेकरून बिबट्याला दबा धरून बसता येणार नाही.

५. सावधगिरी: शौचासाठी उघड्यावर जाऊ नये. घराबाहेर पडताना हातात बॅटरी आणि काठी अवश्य ठेवावी.

"जावेळे परिसरातील नागरिकांनी घाबरून न जाता वनविभागाला सहकार्य करावे. काहीही संशयास्पद हालचाल आढळल्यास तातडीने आमच्या पथकाशी संपर्क साधावा," असे आवाहन वनरक्षक अंगद नागरजोगे, जहिद गटबकर आणि विलास ननावरे यांनी केले आहे.

Post a Comment

0 Comments
Post a Comment (0)

Made with Love by

Digital India News
Connecting India To New World Of Digital Energy
To Top