तालुका प्रतिनिधी
सोयगाव:- येथे सकल हिंदू समाजाच्या वतीने विविध जाती,पंथ आणि सामाजिक संघटनांच्या सहभागातून भव्य हिंदू संमेलन उत्साहात पार पडले.या कार्यक्रमाला परिसरातील हजारो नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावली.संमेलनात प्रमुख वक्ते म्हणून आशुतोष झा यांनी मार्गदर्शन करताना समाजात ऐक्य आणि परस्पर समन्वयाचे महत्त्व अधोरेखित केले. त्यांनी इतिहासातून प्रेरणा घेण्याची गरज व्यक्त करत सामाजिक एकात्मता टिकवण्यासाठी जागरूक राहण्याचे आवाहन केले.कार्यक्रमात विविध संत-महंत आणि मान्यवरांची उपस्थिती होती.पाल येथील संत गोपाल चैतन्य बाबाजी,गिरनारी मठाचे स्वामी ब्रह्मानंद,मथुरा येथील वात्सल्य आश्रमाच्या सारिका ताई मिसाळ, जान्हवीताई सोनवणे (माता यशोदा) तसेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे गोरक्षनाथ आबुज यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले.गोरक्षनाथ आबुज यांनी संमेलनाचा उद्देश स्पष्ट करताना सांगितले की, समाजातील सकारात्मक आणि नकारात्मक पैलूंवर विचार करून एकत्र येणे हे या उपक्रमाचे ध्येय आहे.स्वामी ब्रह्मानंद यांनी धर्म,अर्थ,काम आणि मोक्ष या सनातन मूल्यांचे महत्त्व पटवून दिले.
सारिका ताई मिसाळ यांनी कुटुंबातील संवाद वाढवण्यावर भर देत तरुण पिढीने जागरूक राहण्याचे आवाहन केले.कार्यक्रमाच्या सुरुवातीला सामूहिक हनुमान चालीसा पठण आणि दीपप्रज्वलन करण्यात आले, तर शेवटी वंदे मातरम्ने समारोप झाला.या संमेलनाचे प्रास्ताविक कल्पेश जोशी यांनी सादर केले,सूत्रसंचालन हर्षल हिंदू यांनी केले आणि आभार प्रदर्शन सुधन्वा केणेकर यांनी केले.एकूणच,या संमेलनातून सामाजिक ऐक्य परस्पर संवाद आणि सांस्कृतिक मूल्यांचे जतन करण्याचा संदेश देण्यात आला.
