इयत्ता दहावी व बारावीच्या महत्त्वाच्या बोर्ड परीक्षा सुरू होत असल्याच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांच्या अभ्यासात कोणताही अडथळा येऊ नये आणि नागरिकांना शांततापूर्ण वातावरण मिळावे, यासाठी निफाड पोलीस स्टेशनतर्फे ध्वनीप्रदूषणाबाबत महत्त्वाचे आवाहन करण्यात आले आहे. पोलीस निरीक्षक गणेश गुरव यांनी नागरिकांना कायद्याचे काटेकोर पालन करण्याचे आवाहन करत नियमांचे उल्लंघन झाल्यास कडक कारवाईचा इशारा दिला आहे.
सध्या अनेक विद्यार्थी रात्री उशिरापर्यंत अभ्यास करत असून त्यांच्या शैक्षणिक भवितव्याशी या परीक्षा थेट जोडलेल्या आहेत. अशा संवेदनशील काळात काही ठिकाणी धार्मिक सप्ताह, लग्न समारंभ तसेच इतर सामाजिक कार्यक्रमांदरम्यान पहाटेपासून ते रात्री उशिरापर्यंत लाऊडस्पीकर, डीजे आणि मोठ्या आवाजातील संगीत वाजवले जात असल्याचे प्रकार पोलीस प्रशासनाच्या निदर्शनास आले आहेत. या वाढत्या ध्वनीप्रदूषणामुळे विद्यार्थ्यांबरोबरच आजारी व्यक्ती, ज्येष्ठ नागरिक आणि लहान मुलांनाही नाहक त्रास सहन करावा लागत आहे.
या पार्श्वभूमीवर पोलीस निरीक्षक गणेश गुरव यांनी नागरिकांनी सामाजिक जबाबदारीची जाणीव ठेवून सहकार्य करणे अत्यंत गरजेचे असल्याचे स्पष्ट केले. ध्वनीप्रदूषण प्रतिबंधक कायद्यानुसार रात्री १०.०० (२२.००) वाजल्यानंतर कोणत्याही प्रकारचा मोठा आवाज, लाऊडस्पीकर, डीजे अथवा कर्णकर्कश संगीत वाजवण्यास सक्त मनाई आहे. या नियमांचे उल्लंघन करून रात्री १० नंतर आवाज आढळल्यास संबंधित कार्यक्रम आयोजक तसेच डीजे मालकांवर दंडात्मक कारवाई करण्यात येईल आणि आवश्यकतेनुसार गुन्हा दाखल करण्याची प्रक्रियाही राबविण्यात येईल, असा इशाराही देण्यात आला आहे.
परीक्षेच्या काळात शांत, अभ्यासपूरक वातावरण निर्माण व्हावे यासाठी सर्व नागरिकांनी पोलीस प्रशासनाला सहकार्य करावे, कार्यक्रमांचे वेळापत्रक कायद्याच्या चौकटीत ठेवावे आणि ध्वनीप्रदूषण टाळावे, असे आवाहन निफाड पोलीस स्टेशनतर्फे करण्यात आले आहे. सामाजिक भान राखत विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी प्रत्येकाने संवेदनशीलता दाखवावी, असेही प्रशासनाने नमूद केले आहे.
