वणी प्रतिनिधी:- रितेश पारख
के. आर. टी. कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, वणी येथे आज कर्मवीर बाबुराव ठाकरे यांच्या पुण्यतिथी तसेच संत गाडगे बाबा यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
कार्यक्रमाच्या प्रारंभी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस. एस. काळे यांनी दोन्ही महान विभूतींच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहिली. यावेळी उपस्थित प्राध्यापक, प्राध्यापकेतर कर्मचारी व विद्यार्थ्यांनीही त्यांना अभिवादन केले.याप्रसंगी बोलताना प्राचार्य डॉ. एस. एस. काळे यांनी कर्मवीर बाबुराव ठाकरे यांच्या बहुआयामी व्यक्तिमत्त्वावर प्रकाश टाकला. कर्मवीर ॲड. बाबूराव गणपतराव ठाकरे हे नाशिक जिल्ह्यातील थोर शिक्षणतज्ज्ञ, समाजसेवक आणि वकील होते. त्यांनी नाशिक जिल्हा मराठा विद्या प्रसारक समाजाच्या माध्यमातून शिक्षणाचा व्यापक प्रसार केला. तत्त्वनिष्ठ, करारी व स्वाभिमानी व्यक्तिमत्त्व असलेल्या ठाकरे यांनी समाजाच्या शैक्षणिक उन्नतीसाठी आपले संपूर्ण आयुष्य समर्पित केले, असे त्यांनी नमूद केले.राज्यशास्त्र विभाग प्रमुख डॉ. एस. बी. लोखंडे यांनी संत गाडगे बाबा यांच्या कार्याचा आढावा घेतला. डेबूजी झिंगराजी जाणोरकर हे त्यांचे मूळ नाव असून, ते महाराष्ट्रातील थोर समाजसुधारक, कीर्तनकार आणि संत होते. त्यांनी आयुष्यभर अनिष्ट प्रथा, अस्पृश्यता आणि अस्वच्छतेविरुद्ध लढा दिला. हातात झाडू घेऊन स्वच्छतेचा संदेश देणारे गाडगे बाबा “स्वच्छता व शिक्षण हेच खरे ईश्वरी कार्य” मानत असत, असे मत त्यांनी व्यक्त केले.कार्यक्रमाचे प्रास्ताविक व आभार प्रदर्शन उपप्राचार्य प्राचार्य डॉ. वाय. एम. साळुंके यांनी केले. या कार्यक्रमास विविध विभागांचे प्राध्यापक, प्राध्यापकेतर कर्मचारी तसेच विद्यार्थी उपस्थित होते.
