प्रतिनिधी
दिनांक .२२-०१-२०२६- नागपूर जिल्ह्यातील शेतकरी कुटुंबातील तसेच आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक व बौद्धिक विकासासाठी त्यांना अमेरिकेतील नॅशनल एरोनॉटिक्स अँड स्पेस अॅडमिनिस्ट्रेशन (NASA) येथे विशेष शैक्षणिक दौऱ्यावर पाठवावे, अशी मागणी भारतीय जनता पक्षाचे युवा नेते रोहीत सुधीर पारवे यांनी केली आहे.
यासंदर्भात त्यांनी महाराष्ट्र राज्याचे महसूल मंत्री व नागपूर जिल्ह्याचे पालकमंत्री मा. ना. चंद्रशेखर बावनकुळे यांना निवेदन सादर केले आहे. या निवेदनामध्ये जिल्हा नियोजन समितीच्या निधीतून नागपूर जिल्ह्यातील निवडक गुणवंत विद्यार्थ्यांसाठी NASA शैक्षणिक दौरा आयोजित करण्याची मागणी करण्यात आली आहे.
रोहीत पारवे यांनी आपल्या निवेदनात नमूद केले आहे की, नागपूर जिल्ह्यातील अनेक विद्यार्थी गुणवत्ता, बुद्धिमत्ता आणि जिज्ञासेमध्ये मागे नसतानाही योग्य संधी व संसाधनांच्या अभावामुळे जागतिक दर्जाच्या शैक्षणिक अनुभवापासून वंचित राहतात. आजच्या विज्ञान-तंत्रज्ञानाच्या युगात विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन, संशोधनाची आवड व STEM (Science, Technology, Engineering and Mathematics) क्षेत्रातील करिअरविषयी जागरूकता निर्माण करणे अत्यंत आवश्यक आहे.
NASA सारख्या आंतरराष्ट्रीय दर्जाच्या संशोधन संस्थेला भेट दिल्यास विद्यार्थ्यांना अंतराळ विज्ञान, अत्याधुनिक तंत्रज्ञान, संशोधन प्रक्रिया आणि भविष्यातील करिअर संधींबाबत प्रत्यक्ष अनुभव व प्रेरणा मिळेल. यामुळे त्यांच्या शैक्षणिक वाटचालीला नवी दिशा मिळून उच्च शिक्षण व संशोधन क्षेत्रात करिअर घडविण्यास चालना मिळेल, असा विश्वास रोहीत पारवे यांनी व्यक्त केला आहे.
या उपक्रमासाठी होणारा खर्च जिल्हा नियोजन समितीच्या निधीतून उपलब्ध करून द्यावा व प्रशासनाने सकारात्मक निर्णय घ्यावा, अशी विनंती त्यांनी पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे केली आहे. हा उपक्रम शेतकरी व दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी शासनाचा एक दूरदर्शी व प्रेरणादायी निर्णय ठरेल, असेही रोहीत पारवे यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.
