प्रतिनिधी/ संदीप लाड
मान्सूनच्या पहिल्याच दमदार पावसाने श्रीवर्धन शहराची दाणादाण उडवली असून मुख्य रस्त्यांवर मोठ्या प्रमाणावर पाणी साचल्याचे चित्र समोर आले आहे. पहिल्याच पावसात शहरातील प्रमुख रस्ते तुंबल्यामुळे नगरपरिषद प्रशासनाचा मान्सूनपूर्व कामांचा दावा साफ फोल ठरला असून, प्रशासनाच्या निष्क्रियतेवर स्थानिक नागरिकांमधून तीव्र संताप व्यक्त होत आहे.शहरात झालेल्या पहिल्याच मुसळधार पावसामुळे मुख्य रस्त्यांना ओढ्या-नाल्यांचे स्वरूप आले होते. रस्त्यावरून पाण्याचे लोंढे वाहात असल्याने पादचाऱ्यांना गुडघाभर पाण्यातून वाट काढावी लागत आहे, तर दुचाकी आणि इतर वाहने चालवताना चालकांना कसरत करावी लागत आहे. अनेक ठिकाणी गटारे तुंबल्यामुळे पावसाचे पाणी रस्त्यावर साचले असून, त्याचा फटका स्थानिक व्यापारी आणि वाहतुकीला बसला आहे.दरवर्षी पावसाळ्यापूर्वी प्रशासनाकडून नालेसफाई आणि मान्सूनपूर्व कामांचे नियोजन केल्याचे सांगितले जाते. मात्र, पहिल्याच पावसात उघड्या पडलेल्या या परिस्थितीमुळे नगरपरिषदेने नेमकी कोणती कामे केली? असा संतप्त सवाल श्रीवर्धनकर विचारत आहेत. प्रशासनाच्या या ढिसाळ नियोजनामुळे नागरिकांना पहिल्याच दिवशी नाहक त्रासाला सामोरे जावे लागले आहे.
