बाप्पाच्या मूर्ती घडवण्याच्या कामाला सुरुवात
प्रतिनिधी संदीप लाड
कोकणात पावसाची चाहूल लागली की, प्रत्येक कोकणवासीयांच्या मनाला ओढ लागते ती लाडक्या गणपती बाप्पाच्या आगमनाची. पावसाच्या सरींसोबतच आता गणेशोत्सवाची लगबगही हळूहळू सुरू होत असून, घराघरांत आणि मूर्तिकारांच्या कार्यशाळांमध्ये तयारीला वेग येत आहे.
श्रीवर्धनमध्येही गणपती बाप्पाच्या आगमनाची तयारी सुरू झाली असून, येथील ओंकारा आर्ट मध्ये गणेशमूर्तींना आकार देण्याचे काम सुरू झाले आहे. मूर्तिकार आपल्या कलाकुसरीने बाप्पाच्या विविध आकर्षक रूपांना साकारण्याच्या कामात व्यस्त झाले आहेत.
मूर्ती तयार करण्यापासून त्यावर बारकाईने नक्षीकाम करण्यापर्यंत प्रत्येक टप्प्यावर कलाकार मेहनत घेत आहेत. येत्या गणेशोत्सवासाठी भक्तांच्या पसंतीनुसार विविध आकार, रूप आणि आकर्षक शैलीतील गणेशमूर्ती घडवण्याचे काम सध्या सुरू आहे. लवकरच या मूर्तींना रंगरंगोटी करून सजवण्याच्या प्रक्रियेलाही सुरुवात होणार आहे.
कोकणातील गणेशोत्सव हा केवळ धार्मिक उत्सव नसून तो परंपरा, संस्कृती आणि भावनेचा एक मोठा सोहळा मानला जातो. मुंबईसह विविध शहरांमध्ये राहणारे चाकरमानीही गणपती बाप्पाच्या आगमनासाठी आतुर झालेले असतात.
पावसाच्या सरी, हिरवाईने नटलेला निसर्ग आणि गणरायाच्या तयारीची सुरू झालेली लगबग यामुळे श्रीवर्धनमध्ये आता गणेशोत्सवाचे वातावरण हळूहळू निर्माण होत आहे. मूर्तिकारांच्या हातून आकार घेत असलेला प्रत्येक बाप्पा भक्तांच्या घरातील आनंद आणि श्रद्धेचा केंद्रबिंदू ठरणार आहे.
