शिर्डी पोलिसांनी भोंदूबाबा अशोक खरात याच्याविरुद्धच्या तपासाचा परीघ विस्तारला असून, आता हे प्रकरण केवळ लैंगिक शोषणापुरते मर्यादित न राहता कोट्यवधींच्या आर्थिक गैरव्यवहारापर्यंत पोहोचले आहे. खरातने 'भावनिक आधार' देण्याच्या बहाण्याने महिलांचे मानसिक व शारीरिक शोषण केले, ज्यामुळे अनेक पीडि
त महिला सध्या गंभीर मानसिक धक्क्याखाली असून मानसोपचारतज्ज्ञांची मदत घेत आहेत. तपासादरम्यान, मे २०२१ मध्ये राहाता येथील समता पतसंस्थेत एकाच दिवसात १०० संशयास्पद खाती उघडल्याचे आणि जगदंब पतसंस्थेतील २ कोटी ७४ लाखांच्या बनावट मुदत ठेवींचे (FD) व्यवहार समोर आले आहेत. या आर्थिक साखळीत खरातचे निकटवर्तीय नामकर्ण आवारे आणि शिक्षक रमेश हिंगे यांचीही चौकशी सुरू आहे. दरम्यान, खरातची पत्नी कल्पना हिने अटक टाळण्यासाठी पलायन केले असून, चौकशी सुरू असतानाच खरातचा मुलगाही पोलिसांची परवानगी न घेता गायब झाल्याने तपासात अडथळे निर्माण झाले आहेत. २०१३ पासून फसवणुकीचे गुन्हे दाखल असलेल्या खरातने जाणीवपूर्वक महिलांच्या मानसिकतेचा फायदा घेऊन स्वतःचे आर्थिक साम्राज्य उभे केले होते. आता पोलीस या संपूर्ण प्रकरणातील 'ब्लॅकमेलिंगचा सापळा' आणि गायब झालेल्या संशयितांचा शोध घेत आहेत.
