महाराष्ट्र सावकारी (नियमन) अधिनियम २०१४ अंतर्गत रिसोडमध्ये झाडाझडती.
वाशिम:- सहकार विभागाकडे प्राप्त झालेल्या रिसोड तालुक्यातील अवैध सावकारी व्यवहारासंबंधीच्या दोन तक्रारींची चौकशी करण्यासाठी महाराष्ट्र सावकारी (नियमन) अधिनियम, २०१४ चे कलम १६ अंतर्गत गैर अर्जदार अब्दुल रऊफ शेख चांद, रा. बाल समंदर, चांदनी चौक, रिसोड, ता. रिसोड जि. वाशिम आणि भगबान तुकाराम गुडधे, रा. नागझरी–गोंदाळा, ता. रिसोड जि. वाशिम यांच्या राहत्या घरी सहकार विभाग व पोलिस विभागाच्या दोन पथकांमार्फत दि. ९ जानेवारी २०२६ रोजी झडतीची कार्यवाही करण्यात आली.
गैर अर्जदारांच्या ठिकाणी करण्यात आलेल्या झडतीदरम्यान पुढील चौकशीसाठी काही महत्त्वाचे दस्तऐवज ताब्यात घेण्यात आले असून सदर प्रकरणी सावकारी कायद्यान्वये पुढील चौकशी सुरू आहे.
ही कार्यवाही जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर, पोलिस अधीक्षक अनुज तारे यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था, वाशिम गितेशचंद्र साबळे यांच्या नियंत्रणाखाली पार पाडण्यात आली.
या कार्यवाहीमध्ये सहाय्यक निबंधक, सहकारी संस्था, रिसोड गजानन फाटे, सहाय्यक निबंधक (प्रशासन), अंतर्गत जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था, वाशिम आर. आर. सावंत, सहाय्यक निबंधक, सहकारी संस्था, वाशिम (पथक प्रमुख) एम. डी. कच्छवे, सहाय्यक निबंधक, सहकारी संस्था, मालेगाव (पथक प्रमुख) आर. व्ही. आकुलवार, सहकार अधिकारी श्रेणी १, रिसोड सिद्धार्थ पाटील, सहकार अधिकारी श्रेणी १, वाशिम जे. एस. सहारे, मुख्य लिपिक, वाशिम पी. आर. वाडेकर, सहाय्यक सहकार अधिकारी, वाशिम आर. एन. शेख, सहकार अधिकारी श्रेणी १, मालेगाव एस. के. खान, मुख्य लिपिक, मालेगाव के. व्ही. तलवारे, सहाय्यक सहकार अधिकारी, मालेगाव बी. ए. इंगळे, मुख्य लिपिक, रिसोड एस. बी. रोडगे, सहाय्यक सहकार अधिकारी, रिसोड व्ही. बी. राठोड, कनिष्ठ लिपिक, रिसोड आकाश बेले तसेच पोलिस विभाग व महसूल विभागातील कर्मचारी यांनी सहभाग घेतला.
तरी वाशिम जिल्ह्यातील सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येते की, अवैध सावकारी व्यवहार करणाऱ्यांवर प्रभावी नियंत्रण व कठोर कारवाई करण्यासाठी जिल्हा निबंधक (सावकारी) तथा जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था, वाशिम आणि प्रत्येक तालुक्यातील सावकारांचे सहाय्यक निबंधक तसेच सहाय्यक निबंधक, सहकारी संस्था कार्यालयाकडे गोपनीय स्वरूपात तक्रारी दाखल कराव्यात. तक्रारदाराचे नाव गोपनीय ठेवण्यात येईल. ही माहिती सहाय्यक निबंधक, सहकारी संस्था, रिसोड गजानन फाटे यांनी दिली आहे.