फडणवीसांच्या रणनीतीने विरोधकांचा धुव्वा; 29 पैकी 24 महापालिकांवर सत्ता, कसा साकारला विजय?

Digital India
0

 


 मिनी विधानसभा म्हणून ओळखल्या गेलेल्या राज्यातील २९ महापालिकांच्या निवडणुकीत भाजपच्या नेतृत्वाखालील महायुतीला शुक्रवारच्या निकालात जनादेश मिळाला असून २९ पैकी २५ महापालिकांवर भाजप-महायुतीने झेंडा फडकवला. मुख्यमंत्रिपदावर असताना देवेंद्र फडणवीस यांनी २०१७च्या महापालिका निवडणुकीत भाजपला मोठा विजय मिळवून दिल्यानंतर जवळपास नऊ वर्षांनंतर फडणवीस यांनी भाजपच्या विजयाची पुनरावृत्ती साधून त्यांचा करिष्मा दाखवून दिला.

विधानसभा निवडणुकीत चांगले यश मिळाल्यानंतर भाजप महायुतीने लगेचच राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची रणनीती आखण्यास सुरुवात केली. नगरपालिका निवडणुकीतील यशाने भाजप-शिवसेना महायुतीचा आत्मविश्वास दुणावला. त्यांनी प्रत्येक महापालिकेची जबाबदारी स्थानिक नेत्यांवर सोपवताना निवडणुका संपेपर्यंत महापालिका क्षेत्रातच ठाण मांडून बसण्याचे आदेश त्यांनी नेत्यांना आणि संपर्कमंत्र्यांना दिले. याशिवाय प्रत्येक महापालिका निवडणुकीत वेगवेगेळा मुद्दा चर्चेत आणून विरोधी पक्षाला आपल्या मुद्द्यांवर प्रतिक्रिया देण्यास भाग पाडण्याची खेळी खेळली. उमेदवार निवडीत काटेकोर निकष लावताना वेळेप्रसंगी अन्य पक्षातील नेत्यांनाही पक्षात घेत उमेदवारी दिली. त्यासाठी त्यांनी विरोधी पक्षाची टीका आणि पक्षातील कार्यकर्त्यांची नाराजीही ओढवून घेतली. त्यानंतर पक्षात होणाऱ्या बंडखोरीला आळा घालत निवडणूक व्यूहरचना आखली.


विशेष म्हणजे या निवडणुकीत भाजपचा चेहरा देवेंद्र फडणवीसच होते. फडणवीस यांनीही महत्त्वाच्या महापालिकांमध्ये प्रचारसभा घेतल्या. मतदारांनी त्याला सकारात्मक प्रतिसाद दिला. २०१७च्या मुंबई महापालिका निवडणुकीत ८२ जागा जिंकणाऱ्या भाजपने सत्तेला गवसणी घालण्याची तयारी केली होती. मात्र, तेव्हा एकत्र असलेल्या शिवसेनेच्या आग्रहामुळे फडणवीस यांनी माघार घेतली होती. आता भाजपने एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या मदतीने मुंबई महापालिका जिंकण्याचे स्वप्न जवळपास पूर्णत्वास आणले आहे.

Post a Comment

0 Comments
Post a Comment (0)

Made with Love by

Digital India News
Connecting India To New World Of Digital Energy
To Top